पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क १४०० किमीचा प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 05:38 PM2018-10-02T17:38:55+5:302018-10-02T17:39:10+5:30

मेक इन इंडियाअंतर्गत देशांतर्गत उत्पादनाला विदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. प्रत्यक्षात मात्र देशाच्या ग्रामीण भागात आजही पोटाची खळगी भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

The journey of 1400 km for life live | पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क १४०० किमीचा प्रवास 

पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क १४०० किमीचा प्रवास 

Next

- वैभव गायकर

पनवेल: मेक इन इंडियाअंतर्गत देशांतर्गत उत्पादनाला विदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. प्रत्यक्षात मात्र देशाच्या ग्रामीण भागात आजही पोटाची खळगी भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातील कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना आजही अपेक्षित बाजारपेठ मिळत नाही. त्यामुळे या वस्तूंची विक्री करण्यासाठी या कारागिरांना पायपीट करावी लागते. पोटाची खळगी भरण्यासाठी आंध्रप्रदेशातील पाच  कुटुंबांनी तयार केलेल्या शोभेच्या वस्तू विकण्यासाठी सुमारे १४०० किमीचा प्रवास करून नवी मुंबई गाठली आहे. सध्या खारघरच्या रस्त्यावरच संसार थाटून वेतापासून विविध शोभेच्या वस्तू बनवून आपली उपजीविका करणाऱ्या या कुटुंबांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. 
        दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असलेले कंदील, फ्लॉवर पॉट, लॅम्प, टोपली , गुलदस्ता , आदी वस्तू दिवस-रात्र मेहनत करून हे कुटुंब बनवीत आहे. महागाई वाढल्याने कच्चा माल कमालीचा महागला आहे. आंध्र प्रदेशापेक्षा नवी मुंबई, मुंबई , ठाणे याठिकाणी अशा प्रकारे शोभेच्या वस्तूंची मागणी जास्त असल्याने आम्ही दरवर्षी याठिकाणी येत असतो, अशी प्रतिक्रिया हस्तकलाकार पी पालम्माय यांनी दिली. आंध्रप्रदेशामधील नेल्लुर जिल्ह्यातील आम्ही रहिवासी असून मूळ गावी आम्ही भूमिहीन असल्यामुळे हस्तकलेच्या व्यवसायावर आम्ही आमची उपजीविका भागवीत असतो. दोन तीन कुटुंबे एकत्र येऊन आम्ही रस्त्यावरच आमचा व्यवसाय थाटत असतो. याच ठिकाणी जेवण, काही क्षण विश्रांती घेऊन आमची दिनचर्या पुढे ढकलत असतो. वेत व फायबर वायरच्या जोडीने या वस्तू तयार केल्या जातात. 
          २५० रुपयांपासून ते ११०० रुपयांपर्यंत शोभेच्या वस्तू याठिकाणी विक्रीसाठी ठेवल्या जातात. या वस्तू टिकावू असल्याने ग्राहक देखील अशाप्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पसंत करतो. मात्र चायना मेडमुळे अनेक ग्राहक या वस्तू खरेदीकडे दुर्लक्ष करतो. सध्या चायनामेडला अनेक ठिकाणी विरोध दर्शविला जातो त्या अनुषंगाने भारतीय बनावटीच्या या हस्तकलेच्या वस्तू खरेदी करणे उत्तमच असल्याचे या वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहक दीपक शिंदे  यांनी सांगितले. या हस्तकलेच्या लहान वस्तू बनविण्यासाठी सुमारे ६ ते ७ तासांचा कालावधी लागतो तर मोठ्या आकाराची वस्तू बनविण्यासाठी कमीत कमी १५ ते १८ तास लागत असल्याचे के. यंकटेश या हस्तकलाकाराने सांगितले. 
महिला देखील आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी या व्यवसायात काम करतात. चाळीस वर्षीय मुत्यालमाँ यांनी सांगितले की, आम्ही सध्या राहत असलेल्या जागी वीज, पाणी कसलीच व्यवस्था नाही तरी देखील आम्हाला जीवनाचा गाडा हाकावाच लागणार असल्याने एक महिना याठिकाणी थांबल्यानंतर पुढील वर्षभर कमाविलेल्या पैशावर आम्हाला उपजीविका भागवावी लागणार आहे. खारघरमधील सेक्टर १३ जवळील अग्निशमन दलाच्या इमारतीसमोर या हस्तकलाकारांनी आपला संसार थाटला आहे. याच ठिकाणी या हस्तकलेने बनविलेल्या वस्तू विक्री देखील केल्या जातात. नवी मुंबईसह, अहमदाबाद, पुणे, मुंबई यासारख्या मेट्रोपोलिटन शहरातील एका कोपऱ्यात आपला व्यवसाय हे हस्तकलाकार थाटत असतात.

Web Title: The journey of 1400 km for life live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.