डम्परमधून अवैध वाहतूक : ओव्हरलोड वाहतुकीला अभय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 02:33 AM2019-05-08T02:33:17+5:302019-05-08T02:34:18+5:30

अवजड वाहनांतून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे आरटीओने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने नियमबाह्य वाहतुकीला चालना मिळत आहे.

 Invalid traffic via dumper: Overload traffic abbey? | डम्परमधून अवैध वाहतूक : ओव्हरलोड वाहतुकीला अभय ?

डम्परमधून अवैध वाहतूक : ओव्हरलोड वाहतुकीला अभय ?

Next

नवी मुंबई : अवजड वाहनांतून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे आरटीओने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने नियमबाह्य वाहतुकीला चालना मिळत आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. शिवाय, क्षमतेपेक्षा अधिक बांधकाम साहित्य वाहून नेल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.

नवी मुंबईच्या उरण व पनवेल परिसरातून खडी, क्रॅश सॅण्ड आदी बांधकाम साहित्याने भरलेले हजारो डम्पर दरदिवशी मुंबईच्या विविध उपनगरांत जातात. या प्रत्येक डम्परमध्ये क्षमतेपेक्षा अधिक टन माल भरलेला असतो. अशाप्रकारे ओव्हरलोड मालाची वाहतूक करणे नियमबाह्य आहे. कायदेशीर गुन्हा असतानाही सर्रासपणे वाहतूक केली जात आहे. पनवेल येथील गव्हाण कोपरा, जासई आणि कुंडेवाडा येथून खडी आणि क्रश सॅण्डची मुंबई उपनगरात वाहतूक केली जाते. त्यासाठी दिवसाला तब्बल दीड हजार ओव्हरलोडेड डम्पर सायन-पनवेल महामार्गे मुंबईच्या विविध उपनगरांत दाखल होतात. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या महामार्गावर टप्प्याटप्प्यावर खडी व क्रश सॅण्डने ओव्हरलोड भरलेले डम्पर दिसून येतात. वाशी जकात नाक्यावर तर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत डम्परच्या लांबच्या लांब रांगा दिसून येतात. ही वस्तुस्थिती असतानाही शहरात अशा प्रकारे अवैध वाहतूक होत नसल्याचा दावा नवी मुंबई आरटीओकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, ओव्हरलोड वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी आरटीओने भरारी पथके तैनात केली आहेत. सायन-पनवेल महामार्गावरून दिवस-रात्र मुंबईच्या दिशेने जाणारे ओव्हरलोडेड डम्पर या पथकाच्या नजरेत पडत नाहीत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकूणच या अवैध प्रकाराला आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अप्रत्यक्ष अभय मिळत असल्याचा आरोप वाहनधारकांनी केला आहे.
डम्परमधून नियमानुसार १५ टन मालाची वाहतूक केल्यास त्याला अपेक्षित दर दिला जात नाही. किंबहुना माल घेणाºयांना आर्थिकदृष्ट्या हे सोयीचे वाटत नाही. त्याऐवजी १५ टन क्षमतेच्या डम्परमधून २० टन अधिक माल मिळाल्यास विकासक व कंत्राटदार त्याला पसंती देतात. अतिरिक्त माल वाहून नेल्यास संबंधित डम्पर मालकाला अधिक पैसे मिळत असले तरी त्यामुळे डम्परचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होते. टायर पंक्चर होण्याचे प्रकार नियमित घडतात. अपघाताची शक्यता असते. एकूणच दुरुस्तीचा खर्च वाढत असल्याने हा प्रकार डम्परमालकांना त्रासाचा ठरू लागला आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतुकीवर नियमानुसार प्रतिबंध घालावा, अशी मागणी वाहतूकदारांकडून केली जात आहे. सायन-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. उड्डाणपुलाच्या डागडुजीचीही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मुंबईत डम्परला सायंकाळी ५ ते रात्री ८.३० या वेळेत प्रवेशबंदी आहे, त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर टप्प्याटप्प्यावर या वेळेत ओव्हरलोडेड डम्पर उभे असल्याचे दिसून येते. एकूणच या अनियंत्रित ओव्हरलोड डम्परचा फटका सध्या सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, यासंदर्भात नवी मुंबई आरटीओ अधिकारी दशरथ वाघुले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

उड्डाणपुलाला धोका

वाशी खाडी पुलावरून अवजड वाहनांना प्रतिबंध आहे; परंतु १५ टन मालवाहतुकीची परवानगी असलेल्या डम्परमधून चक्क ३० ते ४० टन अतिरिक्त मालाची वाहतूक केली जात आहे.
विशेष म्हणजे, या पुलावरून दिवसभरात डम्परच्या सुमारे तीन ते चार हजार फेºया होतात. सकाळी ११ नंतर पुलावरून मुंबईकडे जाणाºया डम्परच्या रांगा दिसून येतात.
२४ तास अवैधरीत्या अतिरिक्त माल वाहून नेणाºया डम्पर्समुळे पुलाच्या स्ट्रक्चरला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाºया डम्परचालकांना प्रतिबंध घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

Web Title:  Invalid traffic via dumper: Overload traffic abbey?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.