Atal Setu Suicide News: ३२ वर्षाचा ओंकार जे.जे. रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होता. सोमवारी (७ जुलै) रात्री तो रुग्णालयातून निघाला. निघण्यापूर्वी त्याने आईला कॉल केला. मी लवकरच जेवायला घरी येतोय, असं तो आईला म्हणाला. पण, पोहोचलाच नाही. त्यानंतर जी माहिती मिळाली, त्याने ओंकारच्या आईवर दुःखाचा डोंगरच कोसळला. कळंबोलीला राहणारा ओंकार रुग्णालयातून निघाला, पण पोहोचलाच नाही. अटल सेतूवर येताच त्याने खाडीत उडी मारून आयुष्य संपवले. सोमवारपासून त्यांचा शोध सुरूच आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डॉ. ओंकार कवितके असे अटल सेतूवरून उडी मारून आयुष्य संपवणाऱ्या डॉक्टर तरुणाचे नाव आहे. तो नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये आईसोबत राहत होता. सोमवारी रात्री त्याने साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास अटल सेतूवरून खाडीमध्ये उडी मारली.
ओंकार अटल सेतूवर आला अन्...
पोलिसांनी सांगितले की, सोमवारी ओंकार घरी निघाला होता. अटल सेतूवर येताच त्याने होंडा अमेझ कार थांबवली आणि पुलाच्या कठड्यावरून खाडीमध्ये उडी मारली.
उलवे पोलीस ठाण्याचे कर्मचारी जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना कार आणि आयफोन मिळाला. पोलिसांनी मोबाईलचा लॉक उघडला आणि काही मोबाईल क्रमांकावर कॉल केले. त्यातून हा मोबाईल ओंकारचा असल्याचे समजले.
ओंकार कवितके हा मागली सहा वर्षांपासून जे.जे. रुग्णालयात कार्यरत होता. त्याचा खाडी आणि खाडी किनाऱ्यावर शोध घेतला जात आहे. पोलिसांनी सांगितले की कदाचित मृतदेह किनाऱ्यावर येऊ शकतो, त्यामुळे मच्छिमारांना आणि नागरिकांना याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. असे काही आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आईला म्हणाला लवकरच जेवायला घरी येतो
पोलिसांनी सांगितले की, 'जेव्हा आम्ही त्याचा मोबाईल तपासला. त्याने केलेले कॉल तपासले, तेव्हा त्याने शेवटचा कॉल आईला केला होता. रात्री ९ वाजून ११ मिनिटांनी त्याचा आईशी तो तो शेवटचा कॉल ठरला. तो आईला म्हणाला, 'लवकरच जेवायला घरी येतोय', अशी माहिती उलवे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षण अर्जून राजने यांनी सांगितले.
ओंकारने आत्महत्या का केली? इतकं टोकाचं पाऊल उचलण्यासारखं त्याच्या आयुष्यात काय घडलं होतं, याबद्दल पोलीस तपास करत आहे. पोलीस त्याचे कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणींकडेही याबद्दल चौकशी करत आहेत.
दरम्यान, सोमवारी रात्री ओंकारने खाडीत उडी मारली. तेव्हापासून त्याचा शोध सुरू आहे. बुधवारी दुपारपर्यंत त्याचा मृतदेह हाती लागला नव्हता.