मुंबईतला मॉडेल बनला कॉन्ट्रॅक्ट किलर; ५ लाखांसाठी रस्त्यात चिरला महिलेचा गळा, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 14:24 IST2025-05-26T14:22:11+5:302025-05-26T14:24:59+5:30
हरियाणातील कंटेंट क्रिएटर सुखप्रीत सिंग उर्फ सुख रतिया वाला याला एका खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

मुंबईतला मॉडेल बनला कॉन्ट्रॅक्ट किलर; ५ लाखांसाठी रस्त्यात चिरला महिलेचा गळा, दोघांना अटक
Navi Mumbai Crime:नवी मुंबईत एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी हरियाणातील कॉन्टेंट क्रिएटर अटक करण्यात आली आहे. सुखप्रीत सिंह उर्फ सुख रतिया वाला याने पाच लाख रुपयांची सुपारी घेऊन नवी मुंबईत एका महिलेची गळा चिरून हत्या केली होती. मुंबई पोलिसांनी नोएडा येथून सुखप्रीत सिंह याच्यासोबत त्याच्या मामाच्या मुलाला ताब्यात घेतलं आहे. इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक फॉलोवर्स असलेला सुखप्रीत मॉडेलिंग करण्यासाठी मुंबईत आला होता. मात्र पैशांसाठी त्याने सुपारी घेऊन हत्या केली आणि पळ काढला होता.
नोएडा युनिटच्या स्पेशल टास्क फोर्सने शनिवारी नवी मुंबईत एका महिलेच्या हत्येप्रकरणात दोघांनाही अटक केली. एसटीएफने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील फतेहाबाद येथील रहिवासी सुखप्रीत सिंग आणि गुरप्रीत सिंग या आरोपींना गौतम बुद्ध नगरच्या सूरजपूर भागातील घंटा गोल चक्कर येथून अटक करण्यात आली. या हत्येप्रकरणी नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही फरार होते. चौकशीदरम्यान सुखप्रीत याने पोलिसांना सांगितले की, बारावी पास झाल्यानंतर मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईला आला होता. सुखप्रीत त्याच्या मामाचा मुलगा गुरप्रीतसोबत राहत होता.
सुखप्रीतची भेट गाझियाबादमधील एका महिलेशी झाली होती जिचे नवी मुंबईत सलून होते. त्या सलूनच्या मालकाने सुखप्रीतला एका महिलेला मारण्यासाठी ५ लाख रुपयांची सुपारी दिली होती. ही सुपारी किशोर सिंग नावाच्या व्यक्तीने दिला होती ज्याला त्याच्या पत्नीची हत्या करायची होती. १८ मे च्या रात्री, सुख रतिया आणि गुरप्रीत सिंग यांनी आधी मास्क घालून रेकी केली, नंतर किशोर सिंगच्या पत्नीचा पाठलाग केला आणि रस्त्यावरच गळा चिरून तिची हत्या केली.
ही हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. हत्येपूर्वी सुखप्रीतने ऑनलाइन चाकू खरेदी केला होता. या प्रकरणात पोलिसांनी किशोर सिंग आणि गाझियाबाद येथील अलिशा धनप्रकाश त्यागी आणि पंजाबमधील चरणजित फतेह सिंग कौर उर्फ डिंपल या दोन महिलांना हत्येचा कट रचल्याबद्दल अटक केली होती. त्यांनीच सुख रतिया आणि गुरप्रीत सिंगला ५ लाख रुपये देण्यात आले. वैवाहिक वादामुळे किशोर सिंगने पत्नीची हत्या करण्यास सांगितले होते.