नवी मुंबई : गाडीच्या डिक्कीतून बाहेर निघालेला हात पाहून नागरिकांमध्ये भीती पसरविणाऱ्या चौघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मीनहाज मोहम्मद अमीन शेख (वय २५), शहावार तारीख शेख (वय २४), मोहम्मद अनस अहमद शेख (वय ३०) व इंजमाम अख्तर रजा शेख अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौघे कोपरखैरणे परिसरात राहणारे आहेत. लॅपटॉप विक्री दुकानाच्या प्रमोशनसाठी रील्स बनविण्यासाठी त्यांनी हा खटाटोप केल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिस कामाला लागले होते. सोमवारी रात्री वाशी-सानपाडा दरम्यानच्या रेल्वेरुळांलगत असलेल्या मार्गावर हा प्रकार घडला होता.
व्हिडीओ व्हायरल झाला, पोलिसांचा ताप वाढला
या मार्गाने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकत असल्याचे या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांच्या नजरेस पडले होते. यावरून गाडीतून मृतदेह नेला जात असावा, अशी शक्यता वर्तविली जात होती.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी गाडीचा शोध घेतला. त्यामध्ये लॅपटॉप दुकानाच्या प्रमोशन व्हिडीओच्या रील्ससाठी त्यांनी पोलिसांचा ताप वाढविल्याचे समोर आले.