पनवेलमधून अडीच टन प्लास्टिक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:48 IST2020-02-02T00:48:24+5:302020-02-02T00:48:28+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीत महापालिकेची कारवाई

पनवेलमधून अडीच टन प्लास्टिक पिशव्या जप्त
पनवेल : पनवेल महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांवर बाळगणाऱ्या विरोधात आपली मोहीम तीव्र केली आहे. शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत धाड टाकत सुमारे अडीच टन प्लास्टिक पिशव्या जप्त करीत दोन लाख २५ हजारांचा दंड वसूल केला.पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी प्रभाग अधिकाºयाच्या सहकार्याने ही मोहीम राबविली.
पनवेल शहरातील एकूण १०० व्यापाऱ्यांवर या वेळी धाड टाकण्यात आली, त्यापैकी ४० जणांकडे प्लास्टिक पिशव्या आढळल्याने त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.पनवेल शहरात बाजार समितीत यापूर्वी पालिकेने जनजागृती करूनही सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिक विरोधी मोहीम अशीच राहणार असल्याचे या वेळी लेंगरेकर यांनी सांगितले.