गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश ११ सप्टेंबरला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 02:28 IST2019-09-08T02:27:35+5:302019-09-08T02:28:06+5:30
मुख्यमंत्र्यांची तारीख न मिळाल्याने ९ सप्टेंबरचा प्रवेश सोहळा हुकल्याचे बोलले जात आहे.

गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश ११ सप्टेंबरला?
नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा ९ सप्टेंबरचा मुहूर्त हुकल्यानंतर नवीन तारीख काय? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ११ सप्टेंबरला पनवेलमध्ये येत आहेत. याच मुहूर्तावर वाशी येथील भव्य सोहळ्यात शक्तिप्रदर्शन करीत नाईक आपल्या कुटुंबीयांसह भाजप प्रवेश करणार असल्याचे समजते.
मुख्यमंत्र्यांची तारीख न मिळाल्याने ९ सप्टेंबरचा प्रवेश सोहळा हुकल्याचे बोलले जात आहे. पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. १२ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. तर त्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होत आहे. पितृपक्षात नाईक भाजप प्रवेश करतील असे वाटत नाही. ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री पनवेलमध्ये येणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नाईक याच दिवशी भाजप प्रवेशाचा मुहूर्त साधतील, अशी चर्चा आहे.