गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 05:32 AM2019-09-07T05:32:02+5:302019-09-07T05:32:06+5:30

तारीख आज ठरणार : मुख्यमंत्र्यांच्या नवी मुंबई दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह

 Ganesh Naik's BJP entry may be delayed in navi mumbai | गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता

गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता

Next

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य सोहळ्यातून ९ सप्टेंबर रोजी नाईक भाजप प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे; परंतु मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांच्या नवी मुंबई दौºयाचा असा कोणताही कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ९ सप्टेंबरच्या प्रवेश सोहळ्याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडून प्रवेशाची नवीन तारीख आज सकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या पक्षांतराबाबतच्या आग्रहाचा हवाला देत पहिल्या टप्प्यात संदीप नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा देत माजी महापौर सागर नाईक यांच्यासह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. तर गणेश नाईक व त्यांचे ज्येष्ठ पुत्र संजीव नाईक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भव्य सोहळ्यात शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू आहे; परंतु स्वत: नाईक किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून या संदर्भात अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही. असे असले तरी त्यांच्या समर्थकांकडून ९ सप्टेंबरच्या प्रवेश सोहळ्याविषयी समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे.
मात्र, दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून अद्याप होकार न मिळाल्याने सोमवारचा प्रवेशसोहळा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, शुक्रवारी संदीप नाईक, संजीव नाईक व माजी महापौर सागर नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांची यासंदर्भात भेट घेतल्याचे समजते. त्यानंतरच ९ सप्टेंबरचा नियोजित सोहळा पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांकडून प्रवेशाची नवीन तारीख शनिवारी सकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा सोमवारी वेगळा गट
महापालिकेतील राष्ट्रवादीचे ५५ नगरसेवक कोकण आयुक्तांची भेट घेऊन वेगळा गट तयार करणार असल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर सुरू होती; परंतु ९ सप्टेंबरच्या नियोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील न मिळाल्याने नगरसेवकांची शुक्रवारची ही मोहीम स्थगित केल्याचे समजते. दरम्यान, सोमवारी राष्ट्रवादीचे ५५ नगरसेवक कोकण आयुक्तांकडे जाऊन वेगळा गट स्थापन करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title:  Ganesh Naik's BJP entry may be delayed in navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.