नवी मुंबईत चटणी, भाकरी, ठेच्याचा महापूर; उरलेल्या भाकऱ्या, पाणी बाटल्यांचे अनाथाश्रमात दान
By नामदेव मोरे | Updated: September 3, 2025 10:16 IST2025-09-03T10:12:28+5:302025-09-03T10:16:04+5:30
अन्न, पाणी वाया जाणार नाही याची घेतली काळजी

नवी मुंबईत चटणी, भाकरी, ठेच्याचा महापूर; उरलेल्या भाकऱ्या, पाणी बाटल्यांचे अनाथाश्रमात दान
नामदेव माेरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: आंदोलकांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घरातून चटणी-भाकरीची शिदोरी नवी मुंबईत आली होती. तीन दिवसांत १० लाख भाकरी जमा झाल्या. चटणी, ठेच्यासह अत्यावश्यक साहित्यही जमा झाले. मंगळवारी सिडको प्रदर्शन केंद्रात साहित्याची रास लागली होती. अखेर मदत थांबवा असे, आवाहन करावे लागले होते.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मुंबईतील हॉटेल बंद ठेवली. पाणी कमी पडत असल्याचा संदेश राज्यभर पोहोचला अन् प्रत्येक गावात ‘एक शिदोरी आंदाेलकांसाठी’ अभियान सुरू झाले. प्रत्येक गावातून भाकरी, चपाती, ठेचा, लाेणचे, भाजी, पाणी व इतर साहित्य येण्यास सुरुवात झाली. मदतीचा ओघ आता एवढा वाढला की वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात चार ठिकाणी भाकरी व इतर साहित्य ठेवावे लागत आहे.
भाकरी वेगळ्या करून ठेवल्या जात आहेत. खराब होणारी भाजी तत्काळ वेगळी केली जात आहे. आलेले अन्न तत्काळ आंदाेलकांना देण्याचे प्रयत्न केले जात होते. आंदोलकांनीही यासाठी स्वयंसेवकांची भूमिका बजावली आहे. आंदोलन सुरू झाल्यापासून जवळपास १० लाख भाकरी नवी मुंबईत पाठवण्यात आल्या. संपूर्ण शहराला जेवण देता येईल, एवढे साहित्य उपलब्ध झाले. अखेर मंगळवारी मराठा समाजाने भाकरी खूप झाल्या आता मदत थांबवावी, असे आवाहन केले.
उरलेल्या हजारो भाकऱ्या, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मराठा आंदोलनात सहभागी झालेल्यांसाठी गावखेड्यातून हजारो भाकऱ्या, ठेचा, चटणी, लोणचे व पाण्याच्या बाटल्या मुंबईत पाठविण्यात आल्या होत्या. मंगळवारी सायंकाळी आंदोलन संपल्याने या उरलेल्या भाकऱ्या, चटणी, लोणचे आदी अन्नपदार्थ व पाण्याच्या बाटल्या मुंबईतील गरजू रुग्ण, अनाथ आश्रमातील मुले यांना देण्याचा निर्णय मराठा आंदोलकांनी घेतला. रात्री उशिरापर्यंत विजय माने व बबन भिलारे यांनी कार्यकर्त्यांसह हे अन्न व पाणी योग्य व गरजूंपर्यंत पोहोचेल यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला.
रुग्णालये व अनाथाश्रमात दान
गावातील सामान्य नागरिकांनी कुवतीप्रमाणे वर्गणी काढून हे अन्न, पाणी मुंबईत पाठवले आहे. त्यामुळे ते वाया जाणार नाही याची काळजी घेतल्याची माहिती माने व भिलारे यांनी दिली. भाकरी, पोळी, चुरमुरे, फरसाण, चिवडा, पाण्याची बाटली, ठेचा, खर्डा, लोणचे व इतर पदार्थ मोठ्या प्रमाणात राहिल्याने ते सायन रुग्णालय, जे. जे. रुग्णालय व काही अनाथाश्रमातील गरजूंना वाटप करण्यासाठी पाठवण्यात आले.