Fire turbhe company : नवी मुंबईच्या तुर्भेत कलर कंपनीत भीषण अग्नीतांडव; ३ कंपन्यांमध्ये पसरली लाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 13:01 IST2021-05-02T12:57:50+5:302021-05-02T13:01:46+5:30
Fire turbhe MIDC company : घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Fire turbhe company : नवी मुंबईच्या तुर्भेत कलर कंपनीत भीषण अग्नीतांडव; ३ कंपन्यांमध्ये पसरली लाग
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी मधील बालाजी पॉलीकोट्स या कंपनीला आग लागल्याची घटना रविवारी सकाळी घडली. काही वेळातच हि आग लगतच्या इतर दोन कंपन्यांपर्यंत पसरली. यावेळी अग्निशमन दलाने लगतच्या कंपन्यांना लागलेली आग वेळीच आटोक्यात आणली. परंतु रंग कंपनीला लागलेली आग सुमारे सहा तास धुमसत होती. त्यात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे.
सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बालाजी पॉलीकोट्स (डी ३१५) या कंपनीत हि आग लागली. आगीमध्ये कंपनीतील रंगासाठी वापरलेल्या जाणाऱ्या केमिकल चे ड्रम पेट घेऊन फुटत होते. यामुळे काही वेळातच हि आग बालाजी कंपनीच्या मागच्या व डाव्या बाजूच्या कंपनीत देखील पसरली. त्यामुळे परिसरातील इतरही कंपन्यांना आगीचा होता. आगीची माहिती मिळताच एमआयडीसी व महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चारही बाजूने कंपनी पेटत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते.
अखेर अग्निशमन दलाने लगतच्या दोन कंपन्यांमध्ये पसरलेली आग आटोक्यात आणून तिन्ही बाजूने बचावकार्य सुरु केले. यादरम्यान एक कामगार कंपनीत अडकल्याची माहिती मिळत होती. परंतु आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झाल्याने त्या व्यक्तीच्या जिवंत वाचण्याची शक्यता कमी होती. अखेर सुमारे सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यानंतर कंपनीत अडकलेल्या बहादूर नावाच्या कामगाराचा मृत्यदेह शोधण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली. परंतु दुपार पर्यंत त्याचा मृतदेह हाती लागला नव्हता.
आगीच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. तीन कंपन्यांपर्यंत पसरलेली आग वेळीच आटोक्यात आली नसती तर काही अंतरावरील झोपडपट्टी भागालाही धोका निर्माण झाला असता. या भीतीने परिसरातील नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.