... अखेर ‘तू तू, मैं मैं’ने घोटला प्रेमाचाच गळा; आंतरजातीय प्रेमविवाहाचा ‘सुपारी’ने झाला शेवट
By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 22, 2025 13:03 IST2025-05-22T13:02:40+5:302025-05-22T13:03:42+5:30
पोलिसांपुढे पतीची चलाखी टिकली नाही आणि संपूर्ण बनाव उघडकीस आला.

... अखेर ‘तू तू, मैं मैं’ने घोटला प्रेमाचाच गळा; आंतरजातीय प्रेमविवाहाचा ‘सुपारी’ने झाला शेवट
नवी मुंबई : दोघांचे एकमेकांवर इतके प्रेम की जातीचे बंधन तोडून त्यांनी लग्न केले. परंतु, लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्यात ‘तू तू, मैं मैं’ सुरू झाली. त्यांच्यातील वाद इतका टोकाला गेला की पतीने थेट पत्नीची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. मात्र, पोलिसांपुढे पतीची चलाखी टिकली नाही आणि संपूर्ण बनाव उघडकीस आला.
उलवे येथील अलविना राजपूत ऊर्फ अलविना अडमली खान (वय २७) हिची रविवारी रात्री १२ च्या सुमारास हत्या झाली. ती उलवे सेक्टर ५ येथे पती किशोरसिंग राजपूत (३०) याच्या मेडिकल दुकानाकडे जात होती. यावेळी अज्ञाताने तिला रस्त्यात गाठून तिचा गळा चिरून हत्या केली. पतीच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीवर उलवे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपासात पोलिसांनी तिच्या पतीचाच कट उघड करून त्याच्यासह दोन महिलांना अटक केली.
अलविना आणि किशोरसिंग २०२१ पूर्वी एका औषध कंपनीसाठी सेल्समनपदी काम करत होते. यादरम्यान दोघांची ओळख झाली असता त्याचे प्रेमात रूपांतर झाले. दोघांनी एकमेकांना कसमे-वादे देत आयुष्यभर सोबत राहण्याचा निश्चय करून जातीची बंधने झुगारली. त्यांनी रजिस्टर लग्न केले. तेव्हापासून दोघेही उलवेत राहायला होते. आनंदाने संसार सुरू असताना त्यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वाद होऊ लागले. यामुळे घटस्फोट घेण्याचा दोघांनी निर्णय घेतला, परंतु घटस्फोट घेण्यापूर्वी अलविना ही पती किशोरसिंग याला व्यवसायात मदतीसाठी दिलेले १५ लाख परत मागत होती.
त्यावरून अलविना आणि किशोरसिंग या दोघांमध्ये जमत नसतानाही घटस्फोट रखडला होता. त्याची प्रक्रिया पुढे जात नव्हती.
सात लाख रुपयांचा व्यवहार ठरला
सात लाखांचा व्यवहार ठरला परंतु, यापूर्वी पैसे घेतल्यानंतरही तिने घटस्फोटाला नकार दिला होता, असेही किशोरसिंगने स्पष्ट केले. त्यामुळे तिला कायमचे हटविण्यासाठी किशोरसिंगने एका महिलेलाच तिच्या हत्येची सुपारी दिली.
उलवेतच राहणाऱ्या त्या महिलेने तिच्या मोलकरणीच्या मदतीने परिसरातच राहणाऱ्या दोन तरुणांना ही सुपारी दिली. यासाठी सात लाखांचा व्यवहार ठरवला. त्यापैकी पाच लाख रुपये किशोरसिंगने त्यांना पोहोच केले होते.
त्यानुसार अलविना ही रात्री एकटी पतीच्या मेडिकलकडे येतानाच एकाने तिच्या गळ्यावर वार करून हत्या केली. परंतु, कोणत्याही ठोस कारणाशिवाय एका महिलेच्या हत्येमागचा कोणाचा काय उद्देश असू शकतो, हे तपासताना पोलिसांचा पतीवर संशय बळावला आणि चौकशीत गुन्हा उघड झाला.
पोलिसांनी वागणे हेरले
पत्नीची हत्या झाल्यानंतर पतीची हालचाल पोलिसांना संशयास्पद वाटली. त्यामुळे पोलिसांनी शेजाऱ्यांकडे त्यांच्याबद्दल चौकशी केली असता त्यांच्यात नेहमी भांडण व्हायचे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
तसेच तिच्या एका मित्रासोबत बोलणे, फिरण्यावरूनही त्यांच्यात वाद झाला होता, अशीही माहिती पोलिसांना मिळाली. त्याशिवाय पत्नीच्या हत्येनंतर त्याचे हावभाव हेरून त्याचीच उलट चौकशी केली असता त्याने सुपारी देऊन हत्या केल्याचे कबूल केले.