ईएसआयएस रुग्णालय आवारात बीअर बाटल्यांचा खच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 04:42 IST2018-10-28T04:41:21+5:302018-10-28T04:42:05+5:30
कोट्यवधी रुपये खर्च करून मेकओव्हर करण्यात आलेल्या वाशी येथील राज्य कामगार विमा योजना (ईएसआयएस) रुग्णालयाच्या आवारात रिकाम्या बीअरच्या बाटल्यांचा खच पडला आहे.

ईएसआयएस रुग्णालय आवारात बीअर बाटल्यांचा खच
नवी मुंबई : कोट्यवधी रुपये खर्च करून मेकओव्हर करण्यात आलेल्या वाशी येथील राज्य कामगार विमा योजना (ईएसआयएस) रुग्णालयाच्या आवारात रिकाम्या बीअरच्या बाटल्यांचा खच पडला आहे. विशेष म्हणजे, या बाटल्या प्रवेशद्वाराच्या अगदी दर्शनी भागातच साचल्या आहेत. या प्रकाराकडे रुग्णालय व्यवस्थापनाचे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
वाशी सेक्टर-५ येथे राज्य कामगार विमा योजनेचे जुने रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या परिसरातच कामगारांची वसाहत आहे. सध्या या वसाहतींना विविध समस्यांनी घेरले आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून रुग्णालयाच्या इमारतीची डागडुजी केली आहे. यात अत्याधुनिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे. त्यापैकी अंशत: सेवा सुरूही झाल्या आहेत. असे असले तरी स्वच्छतेच्या बाबतीत मात्र रुग्णालय व्यवस्थापनाला विसर पडल्याचे दिसून आले आहे. कारण रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस बीअर व अन्य शीतपेयाच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. समोरील रस्त्यावरून या बाटल्या सहज दृष्टीस पडतात. सुरक्षारक्षकासाठी असलेल्या केबिनच्या अगदी समोरील कोपऱ्यात या बाटल्या टाकण्यात आल्या आहेत. रुग्णालय इमारत परिसराची नियमितपणे साफसफाई केली जाते; परंतु अगदी दर्शनी भागात पडलेल्या बीअरच्या रिकाम्या बाटल्यांकडे सफाई कामगारांचे लक्ष जात नाही का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.