Elgar Against Weekly Market; Awareness of youth on social media | घणसोलीतील आठवडे बाजारच्या विरोधात एल्गार; तरुणांची सोशल मीडियावर जनजागृती
घणसोलीतील आठवडे बाजारच्या विरोधात एल्गार; तरुणांची सोशल मीडियावर जनजागृती

- अनंत पाटील 

नवी मुंबई : ब्रिटिश काळातील ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या घणसोली गावात आठवडे बाजारामुळे चोऱ्या माऱ्यांच्या प्रकार वाढले आहेत. वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. त्याचा फटका गावातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर अनधिकृतपणे चालणारा घणसोलीतील संडे बाजार बंद करावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात येथील रहिवाशांनी महापालिका आयुक्तांना अलीकडेच एक निवेदन दिले आहे.

घणसोली सद्गुरू रुग्णालय, सरपंच दगडू चाहू पाटील चौक, गावदेवी मंदिर परिसर, साई सदानंदनगर ते डी-मार्ट मॉल परिसर, गावदेवीवाडी रोड ते स्वातंत्र्यसंग्राम चौकपर्यंत दर रविवारी आठवडे बाजार भरविला जातो. मुख्य रस्त्यावरच हा बाजार भरत असल्याने त्याचा फटका येथील दळणवळणाला बसत आहे. प्रत्येक रविवारी जवळपास अडीच हजार फेरीवाले येथील रस्त्यावर अतिक्रमण करतात. या गर्दीचा फायदा घेऊन काही आंबटशौकीन तरुणांकडून महिलांना धक्काबुक्की केली जाते. अनेकदा महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे जुजबी कारण देऊन महापालिकेचे अधिकारी कारवाईकडे अर्थपूर्ण डोळेझाक करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात याच आठवडे बाजारावर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरिश पटनिगिरे यांनी तीन वेळा कारवाई केली होती. घणसोलीतील अतिक्रमण विभागातील काही अधिकाºयांचे या फेरीवाल्यांशी लागेबांधे असल्यामुळे त्यानंतर आजपर्यंत या आठवडे बाजारावर कारवाई करण्यात आली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

घणसोलीतील सरपंच दगडू चाहू पाटील चौकाला या फेरीवाल्यांनी अक्षरश: विळखा घातला आहे. दर रविवारी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत रस्त्यावरून चालताही येत नाही. एखाद्या वेळी गावात काही दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाची गाडी किवा पोलिसांच्या वाहनांनाही गर्दीतून वाट काढणे अवघड होणार आहे. संडे बाजारामुळे घरातून बाहेर जाणेही कठीण झाले आहे.

फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि पालिकेच्या पोर्टलवर आठवडे बाजार कायमचा बंद करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी आता गावातील तरुणपिढी पुढे सरसावली आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रत्यक्षात पाहणी करून बाजार त्वरित बंद करावा, किंवा वाहतूककोंडी होणार नाही, याची दक्षता घेऊन हा बाजार अन्यत्र हलविण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंकुश पांडुरंग नाईक यांनी केली आहे.

Web Title: Elgar Against Weekly Market; Awareness of youth on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.