भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 09:23 IST2025-04-22T09:22:49+5:302025-04-22T09:23:33+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेवरील गेली २० वर्षे असलेली गणेश नाईक यांची एकहाती सत्ता उलथवून लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत

भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी शिंदेसेनेने डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये फूट पाडण्यात यश मिळविले आहे. १२ माजी नगरसेवक आज, मंगळवारी शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. आघाडीत फूट पडली असली तरी हे आव्हान भाजपला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये ‘ओन्ली बीजेपी’चा नारा दिल्यानंतर आता नाईकांच्या ताब्यातील नवी मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महाविकास आघाडीमधील तिन्ही घटक पक्षांमध्ये फूट पाडण्यात आली आहे.
‘हे’ करणार पक्षप्रवेश
काँग्रेस : अविनाश लाड, अंकुश सोनावणे, हेमांगी सोनावणे
शरद पवार गट : वैभव गायकवाड, दिव्या गायकवाड
उद्धवसेना : सोमनाथ वास्कर, काशिनाथ पवार, रतन मांडवे, रंगनाथ औटी, कोमल वास्कर, सुनीता मांडवे, भारती कोळी
विष्णुदास भावे नाट्यगृहात शिंदेसेनेचा मेळावा
उद्धवसेनेचे ७, काँग्रेसचे तीन व शरद पवार गटाचे २ माजी नगरसेवक मंगळवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात होणाऱ्या मेळाव्यात शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.
महापालिकेतील सत्तेसाठी शह-काटशहाचे राजकारण
वाशीमध्ये होणाऱ्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. शिंदे यांनी पक्षफोडीतून एकाच वेळी आघाडीसह भाजपलाही धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदेसेनेची ताकद वाढून भाजपला महानगरपालिका निवडणुकीत आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यामुळे यापुढील काळात सत्तेसाठी शिंदेसेना व भाजप यांच्यामध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू असलेले पाहावयास मिळणार आहे. नाईक यांनी वनमंत्री झाल्यानंतर शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात जनता दरबार घेऊन जिल्ह्यात शत प्रतिशत भाजपचा नारा दिला आहे. तेव्हापासून सावध झालेल्या शिंदे यांनी नाईक यांना त्यांच्या होम ग्राऊंड असलेल्या नवी मुंबईतच घेरण्याची रणनीती आखली आहे. या रणनीतीचा भाग म्हणून शहरात शिंदेसेनेची ताकद वाढविण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार गट व उद्धवसेनेच्या १२ माजी नगरसेवकांना गळाला लावले आहे. यावरून उद्धवसेनेने शिंदे यांच्यावर थेट खोके दिल्याचा आरोप केला आहे. तर शिंदेसेनेने उद्धवसेनेचे स्थानिक नेते निष्क्रिय असल्याचे म्हटले आहे.
पक्ष फोडण्यासाठी दबावाचे राजकारण
खोक्यांचे आमिष दाखवून माजी नगरसेवकांना फोडण्याचे कारस्थान केले जात आहे. ज्यांना पक्षाने सर्वकाही दिले ते वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षांतर करत असल्याचा थेट आरोप उद्धवसेनेने पक्ष सोडणाऱ्या माजी नगरसेवक व शिंदेसेनेवर केला आहे. जे आमिषाला बळी पडत नाहीत त्यांच्याविरोधात कारस्थाने केली जात असल्याचा आरोपही केला आहे. नवी मुंबई संपर्कप्रमुख एम. के. मढवी यांनीही पक्ष फोडण्यासाठी दबावाचे राजकारण केले जात असल्याचे आरोप केले. विठ्ठल मोरे, एम. के. मढवी यांच्यासोबत रंजना शिंत्रे, प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, अतुल कुलकर्णी, सुमित्र कडू, विशाल ससाणे, महेश कोठीवाल, समीर बागवान उपस्थित हाेते.
आरोपांमध्ये तथ्य नाही
उद्धवसेनेने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याची प्रतिक्रिया शिंदेसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी स्पष्ट केली आहे. आरोप करणाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळेच त्यांच्या पक्षाला गळती आहे. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी तथ्यहीन आरोप करत आहेत. शिंदेसेनेत कार्यकर्त्यांचे व नागरिकांचे प्रश्न सुटत असल्यामुळे पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या पुढील काळात अजून मोठे पदाधिकारी पक्षात येणार आहेत.