मुंबई मार्गावरील ई- बोटसेवा १५ ऑगस्टपासून? सहा महिन्यांपासून मुहूर्तच मिळेना; प्रवाशांत नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:08 IST2025-08-06T14:08:29+5:302025-08-06T14:08:45+5:30
उरण रेल्वे मार्गावर पावणेदोन वर्षांपासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाल्याने जेएनपीए-मुंबई सागरी मार्गावर प्रवासी संख्या रोडावली आहे.

मुंबई मार्गावरील ई- बोटसेवा १५ ऑगस्टपासून? सहा महिन्यांपासून मुहूर्तच मिळेना; प्रवाशांत नाराजी
उरण : येथील जेएनपीए-मुंबई सागरी मार्गावरील अत्याधुनिक ई-स्पीड बोट सेवा आता १५ ऑगस्ट किंवा १ सप्टेंबरचा मुहूर्तावर सुरू करणार असल्याचे माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीने सांगितले.
उरण रेल्वे मार्गावर पावणेदोन वर्षांपासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाल्याने जेएनपीए-मुंबई सागरी मार्गावर प्रवासी संख्या रोडावली आहे. यामुळे जेएनपीएला जेएनपीए-मुंबई या सागरी प्रवासी मार्गावरील बोट सेवेचा खर्च परवडत नाही. त्यातच या प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या जुनाट लाकडी बोटी खर्चिक व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही उपयुक्त नसल्याने स्पष्ट झाले आहे. यामुळे जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी प्रदूषणविरहित इलेक्ट्रिक अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेल्या ई-स्पीड बोटींचा पर्याय निवडला.
३८ कोटींच्या खर्चाची तरतूद
अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त दोन फायबरच्या हलक्या ई-स्पीडबोटी १० वर्षांच्या कालावधीसाठी पुरवठा करण्याचे काम माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीला दिले आहे. यासाठी जेएनपीएने ३७ कोटी ८९ लाख ९४ हजार १९० रुपये खर्चाची तरतूदही केली आहे.
उन्हाळी हंगामात २० ते २५ प्रवासी व पावसाळी हंगामात १० ते १२ क्षमतेच्या दोन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविलेल्या दोन स्पीडबोटी फेब्रुवारी पासूनच प्रवासी वाहतुकीसाठी दाखल होणार होत्या.
मात्र, स्पीडबोटींचा वेग, प्रवासी वाहतुकीची क्षमता, तांत्रिक
अडचणींमुळे सहा महिन्यांपासून ही सेवा सुरू करण्यात विलंब होत आहे.
पुन्हा चाचणी करणार
चार्जिंग प्रणाली अद्ययावत करण्याचे काम एका कंपनीकडे सोपविले होते. हे काम आवश्यकतेनुसार करून दिले. ई-स्पीड बोटीच्या पुन्हा चाचण्या घेण्यात येणार आहेत.
त्या यशस्वी झाल्यानंतरच या बोटींनी प्रवासी वाहतूक १५ ऑगस्टपासूनच सुरू करण्यात येणार आहे. पुन्हा तांत्रिक अडथळे निर्माण झाल्यास १ सप्टेंबरच्या मुहूर्तावर ही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीचे ‘एचआर’ नीरज यांनी दिली.