लॉकडाऊनमध्येही १६६ जहाजांची हाताळणी, जेएनपीटीच्या गुणांकामध्ये ४६ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 07:09 IST2020-07-06T01:31:22+5:302020-07-06T07:09:17+5:30
जेएनपीटीने आयात-निर्यातीसाठी विविध उपक्रम राबवत, जून महिन्यात ८९ टक्के कंटेनर मालाची व ५११ ट्रेन्सची हाताळणी करून नवीन विक्रम स्थापित केला आहे.

लॉकडाऊनमध्येही १६६ जहाजांची हाताळणी, जेएनपीटीच्या गुणांकामध्ये ४६ टक्के वाढ
- मधुकर ठाकूर
उरण : शंभर दिवसांच्या लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या जेएनपीटीने ग्लोबल सप्लाई चेन सक्रिय ठेवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जेएनपीटीने आयात-निर्यातीसाठी विविध उपक्रम राबवत, जून महिन्यात ८९ टक्के कंटेनर मालाची व ५११ ट्रेन्सची हाताळणी करून नवीन विक्रम स्थापित केला आहे.
जेएनपीटी हे देशातील प्रमुख बंदर आहे. कोरोना महामारीमुळे सुरू असलेल्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊनच्या काळात जेएनपीटीने मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात ५.२९ टक्के अधिक म्हणजेच २ लाख ८९ हजार २९३ टीईयू इतक्या कंटेनर मालाची तर एकूण १६६ जहाजांची हाताळणी केली आहे, तसेच मागील वर्षीच्या जूनमध्ये ५.६३ टक्के मालाची वाहतूक केली होती.
या वर्षी जूनमध्ये ४.०७ दशलक्ष टन्स मालाची वाहतूक केली आहे. ती जून, २०१९ मधील ५.५३ टक्के दशलक्ष टनांच्या तुलनेत २७.६४ टक्के कमी आहे. लॉकडाऊनचे निर्बंध कमी केल्यामुळे व कारखाने सुरू झाल्यामुळे जेएनपीटीने जून, २०१९च्या तुलनेत या महिन्यात ८९% मालाची निर्यात केली असल्याचा दावा प्रसिद्धीपत्रकातून जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी सेठी यांनी केला आहे.
रेल आॅपरेशन्समध्ये जेएनपीटीने मे, २०२० मध्ये ४९९ ट्रेन्सची हाताळणी केली होती. त्यानंतर, जून महिन्यात ५११ ट्रेन्सची हाताळणी करून नवीन विक्रम स्थापित केला आहे, तसेच मागील वर्षी जून महिन्यात रेल्वेची गुणांक संख्या १६.०४% पर्यंत होती. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या सरासरी रेल्वे गुणांकामध्ये २३.४०% वाढ होऊन ४६% पोहोचली आहे. मालाच्या जलद निर्गमनासाठी पोर्टने लॉकडाऊन कालावधीत विस्तारित गेट सुविधेच्या रूपात आयसीडी मुलुंडसाठी १०६ ट्रेन्सद्वारे ६९५७ टीईयू इतक्या मालाची हाताळणी केली आहे.
जेएनपीटी देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी आपले योगदान व पाठिंबा देतच राहील. सर्व भागधारकांच्या पाठिंब्याने बंदराच्या निरंतर विकासासाठी कर्तव्ये पार पाडत राहू आणि एक राष्ट्र म्हणून आपण या कोरोनाच्या संकटातून लवकरच बाहेर पडून अधिक सामर्थ्यवान होऊ, असा दृढ विश्वासही जेएनपीटी
अध्यक्ष संजय सेठी यांनी शेवटी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केला आहे.