मुंबईच्या मद्यधुंद पोलिसाने दुचाकीस्वाराला उडवले, घणसोलीतील घटना; कारमध्येच सुरू होते मद्यपान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:58 IST2025-08-07T11:57:20+5:302025-08-07T11:58:19+5:30
घणसोली सेक्टर ७ येथे डीमार्ट ते भूमी पार्थ दरम्यानच्या मार्गावर बुधवारी दुपारी १ च्या सुमारास हा अपघात घडला.

मुंबईच्या मद्यधुंद पोलिसाने दुचाकीस्वाराला उडवले, घणसोलीतील घटना; कारमध्येच सुरू होते मद्यपान
नवी मुंबई : कार चालवणाऱ्या मद्यधुंद पोलिसाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घणसोलीत बुधवारी दुपारी घडली. यामध्ये दुचाकीस्वार व सफाई कामगार महिला जखमी झाली. अपघातानंतर पोलिसाने कारसह पळून जाण्याचा प्रयत्न केला असता काही अंतरावर नागरिकांनी त्याला पकडले. त्यावेळी तो मद्यपान करीत कार चालवताना आढळला. त्याच्यावर रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तो मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे.
घणसोली सेक्टर ७ येथे डीमार्ट ते भूमी पार्थ दरम्यानच्या मार्गावर बुधवारी दुपारी १ च्या सुमारास हा अपघात घडला. सिम्प्लेक्स येथे राहणारे विकी उचगावकर हे दुचाकीवरून घराकडे येत होते. त्याचवेळी कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकी सफाई कामगार महिलेला जाऊन धडकली. या अपघातात विकी हे थोडक्यात बचावले. अपघातानंतर ताे नागरिकांसोबत वाद घातल्याने त्याला रबाळे पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत त्याचे नाव रवींद्र पवार (४२) असल्याचे समजले.
पितापुत्र दोघेही मद्यपी; सोसायटीच्या तक्रारी
पाेलिस कारमध्येच बसून मद्यपान करीत परिसरात फिरत असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. तो घरौंदा एफ टाईप सोसायटीत भाड्याने राहणारा आहे. पितापुत्र दोघेही मद्यपी असून, सोसायटीने अनेकदा त्यांच्या कृत्यांवर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, त्यांच्या कृत्यांवर अनेक रहिवाशांचा आक्षेप असल्याने त्यांना घर सोडण्यासाठीदेखील कळविले असल्याचे सोसायटी अध्यक्ष आत्माराम सणस यांनी सांगितले.