महामार्गावरील समस्यांमुळे प्रवाशांमध्ये असंतोष; अंधारामुळे अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 06:42 AM2018-09-07T06:42:21+5:302018-09-07T06:42:37+5:30

सायन - पनवेल महामार्गावरील सर्व पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. याविषयी नागरिकांनी वारंवार आवाज उठविल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेतलेली नाही.

Disgruntle among passengers due to highway problems; The possibility of an accident due to darkness | महामार्गावरील समस्यांमुळे प्रवाशांमध्ये असंतोष; अंधारामुळे अपघाताची शक्यता

महामार्गावरील समस्यांमुळे प्रवाशांमध्ये असंतोष; अंधारामुळे अपघाताची शक्यता

Next

- शैलेश चव्हाण

तळोजा : सायन - पनवेल महामार्गावरील सर्व पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. याविषयी नागरिकांनी वारंवार आवाज उठविल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेतलेली नाही. अंधारामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. निष्काळजीपणा करणारे प्रशासन व ठेकेदाराविरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
शासनाने १२00 कोटी खर्च करून बांधलेल्या महामार्गावरील पथदिवे बंदच आहेत. अंधारामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कळंबोली मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरील पुणे एक्स्प्रेसवेच्या सुरवातीला खासगी वाहनांचा अनधिकृत थांबा तयार झाला आहे. यामुळे रोडवर वाहतूककोंडी होत आहे. अंधार व वाहतूककोंडी यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. कामोठे, कळंबोली शिवसेना शाखा व मॅकडोनाल्ड हॉटेलसमोर सध्या मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या ठिकाणी असलेल्या पादचारी पुलाखाली एसटी महामंडळाचा अधिकृत थांबा आहे, मात्र याच मार्गावर खासगी ट्रॅव्हल्स, त्याचप्रमाणे खासगी गाड्या थांबत असल्याने सध्या दुपारपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी व यामुळे वाहतूककोंडी होत आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळेस रस्त्यावर विजेचे पोल बंद असल्याने रात्रीच्या वेळेस समोरून येणाऱ्या भरधाव गाड्यांचा अंदाज येत नाही. अंधारामुळे येथे मद्यपी, अमली पदार्थांचे सेवन करणाºयांचा वावरही वाढला आहे. चोरीच्या घटनांमध्येही वाढ होवू लागली आहे.
कळंबोली, कामोठेप्रमाणे नवी मुंबईमधील वाशी, सानपाडा, नेरूळमध्ये एस.टी. च्या थांब्यावर अनधिकृतपणे खासगी वाहने उभी केली जात आहेत. यामुळे संपूर्ण रोड अडविला जात असून रात्री चक्काजामची स्थिती असते. नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पथदिव्यांचे वीज बिल भरले नसल्यामुळे विद्युतपुरवठा बंद करण्यात आला आहे. लवकरात लवकर पथदिवे बसविले नाहीत तर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
फिफा वर्ल्डकपदरम्यान महामार्गावरील पथदिवे सुरू केले होते. महामार्गावरील सर्व समस्या सोडविल्या होत्या, परंतु फिफा स्पर्धा संपल्यानंतर पुन्हा महामार्गाला समस्यांचा विळखा पडला आहे. पथदिव्यांचे बिलही भरले जात नाही. समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे प्रवाशांनी व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

वारंवार याबाबत शासनाला हा प्रकार लक्षात आणून दिला तरी देखील गांभीर्याने याकडे लक्ष दिले जात नाही. या ठिकाणी असलेला थांबा या ठिकाणाहून दुसरीकडे उभारावा जेणेकरून प्रवाशांना या समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
- प्रशांत रणवरे,
सामाजिक कार्यकर्ते

महामार्गावरील विजेच्या पोलच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून चार दिवसात उर्वरित काम पूर्ण करून पूर्ववत विद्युतपुरवठा सुरू केला जाईल.
- विजय सानप,
सा.बां. कनिष्ठ अभियंता,
विद्युत विभाग

 

Web Title: Disgruntle among passengers due to highway problems; The possibility of an accident due to darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.