नवी मुंबईमध्येही चर्चा मनसे फॅक्टरची

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 01:15 AM2019-04-18T01:15:21+5:302019-04-18T01:15:49+5:30

ठाणे लोकसभा निवडणुकीमध्येही मनसे फॅक्टरची चर्चा सुरू झाली आहे.

The discussion also took place in Navi Mumbai with the MNS factor | नवी मुंबईमध्येही चर्चा मनसे फॅक्टरची

नवी मुंबईमध्येही चर्चा मनसे फॅक्टरची

Next

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : ठाणे लोकसभा निवडणुकीमध्येही मनसे फॅक्टरची चर्चा सुरू झाली आहे. २००९ मध्ये मनसेमुळेच शिवसेनेच्या हातून ठाणे निसटले होते. २०१४ मध्ये प्रभाव दिसला नसला तरी तब्बल ४८,८६३ मते मिळाली होती. यामुळे उमेदवार नसला तरी मनसेची ताकद कमी लेखणे कोणालाच परवडणारे नाही. राज ठाकरे यांच्या सभांचा किती परिणाम होईल. कोणाला फायदा होणार व कोणाला बसणार फटका, याचा अंदाज नवी मुंबईमधील राजकीय वर्तुळामध्येही लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे. ठाणेमध्येही त्यांची सभा होणार असल्यामुळे त्याचा निवडणुकीवर नक्की किती परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नवी मुंबईमध्येही सोशल मीडियासह राजकीय वर्तुळामध्ये याचीच चर्चा सुरू झाली आहे. २००९ मध्ये मनसे फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता. ठाणे लोकसभा मतदारसंघामधील उमेदवार राजन राजे यांनी तब्बल एक लाख ३४ हजार ८४० मते मिळविली होती. यामुळे शिवसेनेचा गड कोसळून राष्ट्रवादीचे संजीव नाईक जिंकून आले होते. त्यानिवडणुकीत राज ठाकरे यांची ठाण्यामधील सभा निर्णायक ठरली होती. २०१४ च्या निवडणुकीमध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊनही अभिजीत पानसे यांना तब्बल ४८,८६३ मते मिळाली होती. लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्येही यापूर्वी मनसेची भूमिका महत्त्वाची ठरली होती. २००९ च्या बेलापूर मतदारसंघामध्ये मनसेच्या राजेंद्र महाले यांना १९ हजार ५६९ मते मिळाली होती. ही मते राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली होती.
यापूर्वी एकवेळी लोकसभा व नंतर विधानसभेच्या निकालामध्ये मनसेमुळे युतीला फटका बसला होता व राष्ट्रवादीला फायदा झाला होता. यामुळे या वेळी मनसेचा उमेदवार नसला तरी राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे होणाऱ्या फायदा व तोट्यावर गांभीर्याने विचार होत आहे.
शिवसेनेकडून पुन्हा फटका बसू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. राष्ट्रवादीकडून मनसेची मते पारड्यात पाडण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करत नाही; परंतु पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून शहरामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका, चौक सभा घेतल्या जात आहेत.
>एकही नगरसेवक नाही
ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये २०१४ च्या निवडणुकीमध्ये मनसेचा प्रभाव फारसा दिसला नाही. मनसेच्या उमेदवारांना एकही मतदारसंघामध्ये पाच हजार मतेही मिळविला आली नाहीत. सद्यस्थितीमध्ये महानगरपालिकेमध्येही एकही नगरसेवक नाही; परंतु पाच वर्षांमध्ये विविध आंदोलनामधून मनसेने प्रभाव पाडला आहे.

Web Title: The discussion also took place in Navi Mumbai with the MNS factor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.