तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 06:59 IST2025-09-27T06:58:43+5:302025-09-27T06:59:16+5:30
नेरूळमध्ये राहणाऱ्या महिलेला सतत प्रकृतीची दुखणी सुरू होती. कुटुंबाने तिची तपासणी केली असता एका आजाराचे लक्षण दिसून आले.

AI Generated Image
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : एखाद्या व्यक्तीला आजारपणाने ग्रासले जावे आणि त्यावर लाखो रुपये खर्च करूनही ती व्यक्ती बरी न होणे, असे अनेक प्रकार घडत असतात. मात्र, उपचारावर जवळपास तीन कोटी रुपये खर्चूनही आई बरी न झाल्याने मुलाने पोलिसांकडे तक्रार केल्याचा प्रकार नवी मुंबईत घडला. २०१९ पासून महिलेवर उपचार सुरू होते. मात्र, तिच्यावर झालेले उपचार औषधांचे की मंत्र-तंत्राद्वारे आधारावर होते, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
नेरूळमध्ये राहणाऱ्या महिलेला सतत प्रकृतीची दुखणी सुरू होती. कुटुंबाने तिची तपासणी केली असता एका आजाराचे लक्षण दिसून आले. त्यातून बरं करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना पालघरमध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी त्यांना आजारपणातून बाहेर काढण्यासाठी उपचाराची हमी दिली. त्यानुसार २०१९ पासून त्या व्यक्तींमार्फत महिलेवर उपचार सुरू झाले. मात्र, अद्यापपर्यंत काहीच फरक न पडल्याने व उपचारावर तब्बल तीन कोटी रुपये खर्च झाल्याने कुटुंबीयाने थेट पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हाही दाखल झाला. परंतु यामुळे पोलिसांपुढे उपचार करणारे खरेच डॉक्टर आहेत की नाही? यासह अनेक प्रश्न पडले आहेत.
गुन्ह्याचा तपास करण्याचे पोलिसांसमोर आवाहन
उपचार करूनही गुण न आल्याने झालेल्या फसवणुकीचा हा बहुतेक पहिलाच गुन्हा असू शकतो. त्यामुळे आजवर सराईत गुन्हेगारांची पद्धत ओळखून गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पोलिसांना उपचाराची पद्धत समजून घेऊन हा गुन्हा उकल करावा लागणार आहे. त्यातच संबंधितांनी आपल्याला धमकीही दिल्याचा तक्रारदारांचा आरोप असल्यानेही पोलिसांना सर्वच बाजू तपासाव्या लागणार आहेत.
औषधोपचार की मंत्र-तंत्र?
कोणत्याही आजारावर उपचाराच्या बहाण्याने पैसे उकळल्याची ही काही नवी घटना नाही. मात्र हा प्रकार कोणत्या रुग्णालयाविरोधात नसून काही व्यक्तींविरोधात आहे. यामुळे पोलिसही अचंबित झाले असून, हा प्रकार नेमका औषधोपचाराचा की मंत्र-तंत्राचा? असाही प्रश्न पोलिसांना पडला.