नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देणार का? अजित पवार म्हणाले, "उद्घाटन केलं की पुढच्या गोष्टी.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:39 IST2025-10-10T11:24:16+5:302025-10-10T13:39:53+5:30
नवी मुंबई विमानतळाच्या नावावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केले.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देणार का? अजित पवार म्हणाले, "उद्घाटन केलं की पुढच्या गोष्टी.."
Ajit Pawar on Navi Mumbai Airport: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. यावेळी या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येईल अशी अपेक्षा भूमिपुत्रांना होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा न केल्याने पुन्हा एकदा भूमिपुत्रांमध्ये प्रचंड नाराजीचा सुरु उमटला आहे. विरोधकांनीही दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा न झाल्याने सरकारवर सडकून टीका केली. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरुन महत्त्वाचे विधान केले आहे.
नवी मुंबई विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. मात्र नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार दि बा. पाटलांचे नाव देण्याबाबत कोणताही उल्लेख न केल्याने भूमिपुत्रांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता भूमिपूत्र आणि सरकार यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबई विमातळाला दि .बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई व पालघर इथल्या स्थानिक भूमिपुत्रांकडून वारंवार केली जात आहे. सरकारने त्याबाबत सकारात्मकता देखील दाखवली होती. मात्र उद्घाटनच्या कार्यक्रमात याची घोषणा न झाल्याने भूमिपुत्रांचा अपेक्षा भंग झाला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव देण्यात येणार की ते बदलण्यात येणार असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना अजित पवार यांनी जनतेच्या बहुमताचा विचार करुनच निर्णय घेतला जाईल असं म्हटलं.
"एकदा ते विमानतळ व्यवस्थितपणे चालू होऊ द्या. पंतप्रधान मोदींनीही विमानतळाची पाहणी केली. साधारण विमानसेवा सुरु होण्यासाठी साधारण ४५ दिवस लागणार आहेत. एकदा मान्यवरांनी तारीख दिली आणि उद्घाटन केलं की पुढच्या गोष्टी गतीने व्हायला मदत होते. मुंबईच्या विमानतळावर खूप मोठा ताण आहे. त्यामुळे या विमानतळाची गरज होती. आम्ही वाढवण येथेही विमानतळ तयार करण्यासंदर्भात सूतोवच केले आहे. कारण तिथेही आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार करावे लागणार आहे. आता उद्घाटन केलेल्या विमानतळाची क्षमता नऊ कोटी आहे. राहिलेली कामे चांगल्या पद्धतीने करण्याची आमची भूमिका आहे. त्यासंदर्भात तिथल्या लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या लक्षात घेऊन सरकारकडून योग्य ती कारवाई करु. नाव देण्याच्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथल्या वेगवेगळ्या शिष्टमंडळांशी चर्चा केलेली आहे. अशा जेव्हा मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी येते त्यावेळी जनतेच्या बहुमताचा विचार करुनच निर्णय घेतला जातो," असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.