नामदेव मोरे / नवी मुंबईमहानगरपालिका क्षेत्रामध्ये डेंग्यू व मलेरियाचे थैमान सुरू आहे. रूग्णांची संख्या प्रचंड वाढली असून सर्वच रूग्णालयांमधील आयसीयू विभाग हाऊसफुल्ल झाले आहेत. बोनसरीमध्ये राहणाऱ्या ओमकार रंगीलाल यादव (१८) या तरूणाला वेळेत उपचार मिळाले नसल्याने मृत्यू झाला आहे. शहरवासी भयभीत झाले असताना महापालिका प्रशासन मात्र साथ नियंत्रणात असल्याचा दावा करून जबाबदारी झटकत आहे. एमआयडीसीमधील बोनसरीगाव व परिसरामध्ये डेंग्यू, मलेरियाची साथ पसरली आहे. अनेक रूग्ण महापालिका व इतर रूग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते दीपक गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही धुरीकरण व औषध फवारणी केली जात नाही. याच परिसरामध्ये राहणाऱ्या ओमकार रंगीलाल यादव या तरूणाला डेंग्यूची लागण झाली. शनिवारी त्याची प्रकृती गंभीर झाल्याने रात्री ८ वाजता महापालिकेच्या प्रथम संदर्भ रूग्णालयामध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी रूग्णालयामधील आयसीयूमध्ये जागाच शिल्लक नाही. यामुळे रूग्णास जे.जे. किंवा इतर ठिकाणी घेवून जावे असा सल्ला दिला. खूप विनंती करूनही काहीही उपयोग झाला नसल्याने अखेर त्या तरूणास नेरूळमधील डॉ. डी.वाय. पाटील रूग्णालयात नेण्यात आले. तेथे तत्काळ उपचार सुरू केले. पण रूग्णास तातडीने आयसीयू विभागात ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. तेथील आयसीयूमध्येही जागा नसल्याने सोबत आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तेरणा व इतर रूग्णालयांमध्ये चौकशी केली पण तेथेही आयसीयूमध्ये जागा शिल्लक नव्हती. अखेर साडेदहा वाजण्याच्या सुमारास या तरूणाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. शहरात सर्वच परिसरामध्ये डेंग्यू, मलेरियाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. पण महापालिका प्रशासन मात्र साथ नियंत्रणात असून गतवर्षीपेक्षा रूग्णांची संख्या कमी असल्याचे सांगत आहे. करावे, दारावे, तुर्भे इंदिरानगर, गोठीवली, घणसोली व इतर परिसरामध्ये स्थिती हाताबाहेर जावू लागली आहे. शहरातील सर्वच रूग्णालयांमध्ये रूग्णांच्या रांगा लागल्या आहेत. खाजगी रूग्णालयामधील डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर डेंग्यू, मलेरियाचे थैमान सुरू असल्याचे मान्य केले. तापाच्या रूग्णांची संख्या वाढल्याने आयसीयू विभागात एकही बेड शिल्लक नाही. महापालिकेने ऐरोली, नेरूळ व सीबीडीमध्ये रूग्णालये बांधली आहेत पण ती वेळेत सुरू झाली नाहीत. यामुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. पालिका रूग्णालयामध्ये गेलेल्या रूग्णांना जागा शिल्लक नसल्याचे कारण देवून मुंबई व इतर ठिकाणी जाण्यास भाग पाडले जात आहे. योग्य उपचार मिळत नसल्याने रूग्णांना जीव गमवावा लागत आहे. महापालिकेकडे तक्रार केल्यास उपाययोजना होण्याऐवजी गुन्हे दाखल होण्याची भीती वाटत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व स्तरातून तीव्र्र नाराजी व्यक्त होत आहे. च्डेंग्यूमुळे मृत्यू झालेला ओमकार रंगीलाल यादव तरूण मूळचा उत्तरप्रदेशचा आहे. गरिबीमुळे रोजगारासाठी मुंबईत आला. च्वेटरचे काम करणाऱ्या ओमकारला डेंग्यू झाल्यानंतर वेळेत योग्य उपचार मिळाले नाहीत. ताप कमी होत नसल्याने त्याने वडिलांना फोन करून मला गावी घेवून जा असा निरोप दिला. वडील शनिवारी मुंंबईसाठी निघाले आहेत.
डेंग्यू, मलेरियाचे थैमान
By admin | Updated: October 10, 2016 03:46 IST