CoronaVirus Lockdown News: "गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ‘ब्रेक द चेन’?"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 01:22 AM2021-04-10T01:22:33+5:302021-04-10T07:25:26+5:30

व्यावसायिकांचा संतप्त सवाल; दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या

CoronaVirus Lockdown News traders businessman express anger over break the chain | CoronaVirus Lockdown News: "गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ‘ब्रेक द चेन’?"

CoronaVirus Lockdown News: "गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ‘ब्रेक द चेन’?"

Next

नवी मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या माध्यमातून ‘ब्रेक द चेन’ मोहीम राबवून कडक निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने तसेच लहान व्यवसाय बंद ठेवण्यात येत असल्याने नवी मुंबईतील लहान व्यवसाय करणारे व्यावसायिक संतप्त झाले असून, कसले ‘ब्रेक द चेन’ गळ्यातील चेन मोडायची वेळ आली असल्याची भावना व्यक्त करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुकाने बंद ठेवणे पर्याय नसून दिवसातून काही वेळ दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली जात आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून नवी मुंबई शहरात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांना सुविधा देण्यासाठी बंद केलेली कोविड केअर सेंटर खुली केली जात आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून राज्यात शासनाच्या माध्यमातून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये सर्वच उद्योग, व्यापार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्य नोकरदार वर्गासह लहान व्यावसायिक भरडले गेले. हातावरचे पोट असणाऱ्यांना उपासमारीची झळ सोसावी लागली होती. नोव्हेंबर २०२० पासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यावर जानेवारी महिन्यापासून उद्योगधंदे काही प्रमाणात व्यवस्थित सुरू झाले होते. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाचे प्रमाण वाढत असून, मार्च महिन्यात कोरोनारुग्णांचे आकडे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यावर उपाय म्हणून ‘ब्रेक द चेन’द्वारे शासनाने अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाविरुद्ध लहान व्यावसायिकांसह, व्यापारीदेखील संतापले असून, कसले ‘ब्रेक द चेन’ गळ्यातील चेन मोडायची वेळ आली असल्याची भावना व्यक्त करीत आहेत. कोरोनाच्या लढाईत आम्ही शासनाच्या सोबत आहोत; परंतु दुकाने बंद ठेवणे यासाठी पर्याय नसल्याचे सांगत दिवसातून काही वेळ दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

दोन महिनेच सुरू राहिला व्यवसाय, कर्ज कसे फेडायचे?
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक महिने व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे हातावरचे पोट असलेल्या लहान व्यावसायिक आणि सामान्य नोकरदार वर्गावर उपासमारीची वेळ आली होती. त्यानंतर दोनच महिने व्यवसाय सुरू होते. आता पुन्हा कोरोना वाढल्याने व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न लहान व्यावसायिक आणि सामान्य नोकरदार वर्गाला पडला आहे.

सततच्या लॉकडाऊनमुळे तणाव वाढतोय
गेल्या वर्षभरापासून व्यवसाय बंद असल्याने खूप अडचणी येत आहेत. बँकांचे हफ्ते थकले आहेत, मुलांची शैक्षणिक फी भरलेली नाही, उदरर्निवाह करणे जिकिरीचे झाले असून कर्ज वाढले आहे. त्यामुळे व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याच्या निर्णयामध्ये शासनाने शिथिलता देणे गरजेचे आहे.
- भावना पटेल

गेल्या वर्षभरात दोनच महिने दुकान सुरू होते; परंतु भाडे पूर्ण वर्षभराचे भरावे लागणार आहे. जानेवारी महिन्यापासून व्यवसाय सुरू झाल्याने सर्व हळूहळू पूर्वपदावर येईल अशी अशा निर्माण झाली होती. परंतु एप्रिल महिन्यात पुन्हा तोच प्रसंग आल्यावर आता काय करायचं, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
- प्राजक्ता दिवेकर

लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अजूनही होत आहे. उत्पन्न बंद परंतु खर्च आणि कर्ज वाढतच आहे. व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यापेक्षा वेळेचे बंधन घालून काही वेळ तरी व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिली पाहिजे. शासनाने पुन्हा दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने दागिने विकून घर चालवत आहोत.
- पायल ठाकूर

कोरोनाच्या लढाईत आम्ही शासनासोबत आहोत; परंतु आमचा व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवणे हा उपाय असू शकत नाही. त्यामुळे आमच्या अडचणी वाढत आहेत. गेल्या वर्षभरात खूप समस्या आल्या. यापुढे उदरर्निवाह करणेदेखील कठीण आहे. शासनाने लहान व्यावसायिकांच्या आर्थिक परिस्थितीचा सहानुभूतिपूर्वक विचार करणे गरजेचे आहे.
-  साधना गर्जे

Web Title: CoronaVirus Lockdown News traders businessman express anger over break the chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.