Corona Virus: मृत्युदर रोखण्याचे आव्हान कायम, नवी मुंबईत प्रतिदिन ९ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 09:53 IST2021-05-12T09:53:17+5:302021-05-12T09:53:52+5:30
नवी मुंबईमध्ये एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. प्रतिदिन १ हजार ते १४०० रुग्ण वाढू लागले होेते. रुग्णवाढ नियंत्रणात आणण्यासाठी ब्रेक द चेन अभियान प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केल्यापासून रुग्णवाढ नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली.

Corona Virus: मृत्युदर रोखण्याचे आव्हान कायम, नवी मुंबईत प्रतिदिन ९ जणांचा मृत्यू
नामदेव मोरे-
नवी मुंबई : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यात महानगरपालिका प्रशासनास काही प्रमाणात यश येऊ लागले आहे. रुग्णवाढ कमी झाल्याने दिलासा मिळाला असला तरी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मे महिन्यात प्रतिदिन सरासरी ९ जणांचा मृत्यू होत असून, ते प्रमाण कमी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
नवी मुंबईमध्ये एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. प्रतिदिन १ हजार ते १४०० रुग्ण वाढू लागले होेते. रुग्णवाढ नियंत्रणात आणण्यासाठी ब्रेक द चेन अभियान प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केल्यापासून रुग्णवाढ नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली. सद्य:स्थितीमध्ये सरासरी २५० रुग्ण वाढत असून साडेचारशे जण कोरोनामुक्त होत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास ९५ टक्के झाले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ३.५७ टक्क्यांवर आली आहे. दुसरी लाट थोपविण्यात यश येत असले तरी दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एप्रिलमध्ये १९४ जणांचा मृत्यू झाला होता. मे महिन्यात प्रतिदिन सरासरी ९ जणांचा मृत्यू होत आहे. दहा दिवसांमध्ये ९० जणांचा मृत्यू झाला आहे. ८० टक्के मृत्यू ५० पेक्षा जास्त वयोगटातील आहेत. लहान मुले व तरुणांचे प्रमाण २० टक्के आहे. तरुणांची सरासरी कमी असली तरी दुर्लक्ष करण्यासारखी नाही. दहा वर्षांपर्यंत १० जणांचा, २० ते ३० वयोगटातील २४ व ३० ते ४० वयोगटातील ८२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
वर्षभरात घणसोली नागरी आरोग्य क्षेत्राच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. करावे नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात १०४, जुहूगाव परिसरात १०१ व ऐरोली आरोग्य केंद्राच्या परिसरात १०० जणांचा मृत्यू झाला आहे. चिंचपाडामध्ये सर्वांत कमी १० जणांचा मृत्यू झाला आहे. झोपडपट्टी परिसरात रुग्णसंख्याही कमी आहे. मृत्यूचा आकडाही नियंत्रणात असल्याचे निदर्शनास आले आहे.
पन्नाशीच्या पुढील रुग्णांवर विशेष लक्ष
महानगरपालिका प्रशासनाने ५० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मृतांमध्ये ८० टक्के प्रमाण या वयोगटातील आहे. यामुळे या वयोगटातील रुग्णांनी घरी उपचार न घेता रुग्णालयात भरती व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
आरोग्य केंद्रनिहाय मृतांचा आकडा
आरोग्य केंद्र मृत्यू
घणसोली १०७
करावे १०४
जुहूगाव १०१
ऐरोली १००
सीबीडी ८५
रबाळे ८८
वाशीगाव ८०
खैरणे ८१
महापे ९२
सानपाडा ९१
शिरवणे ६४
सेक्टर ४८
सीवूड ५९
नेरूळ एक ५०
कुकशेत ५७
नेरूळ दोन ४९
पावणे ४९
नोसिल नाका ३७
दिघा ४७
तुर्भे ५४
इलठाणपाडा २९
कातकरीपाडा ११
चिंचपाडा १०
इंदिरानगर १४
वयोगटानुसार मृत्यूचे प्रमाण पुढीलप्रमाणे...
वयोगट मृत्यू
० ते १० ३
११ ते २० ७
२१ ते ३० २४
३१ ते ४० ८२
४१ ते ५० १६८
५१ ते ६० ३५३
६१ ते ७० ४१५
७१ ते ८० २८३
८१ ते ९० १०७
९१ ते १०० ८