पनवेलमधील नागरिकांचे टेरेस पार्ट्यांना प्राधान्य, आखले शाकाहारी बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 11:41 PM2020-12-31T23:41:00+5:302020-12-31T23:41:08+5:30

नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी, चोख पोलीस बंदोबस्त

Citizens of Panvel prefer terrace parties | पनवेलमधील नागरिकांचे टेरेस पार्ट्यांना प्राधान्य, आखले शाकाहारी बेत

पनवेलमधील नागरिकांचे टेरेस पार्ट्यांना प्राधान्य, आखले शाकाहारी बेत

Next

पनवेल : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकांनी वेगवेगळे बेत आखले आहेत. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत खबरदारी बाळगूनच नवीन वर्षाचे स्वागत पनवेल परिसरात करण्यात येणार आहे. रात्रीची संचारबंदी लक्षात घेता बहुतांशी नागरिकांनी टेरेस पार्टीला प्राधान्य दिले.

पनवेलमधील ग्रामीण भागात मोठ्या संख्येने फार्महाउस आहेत. मात्र या वर्षी फार्महाउस मालकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे ही फार्महाउसेस ओस पडण्याची शक्यता आहे. संचारबंदीमुळे अनेकांनी घरीच थांबणे पसंत केल्याने हॉटेल व्यावसायिक चिंतेत होते. तर, नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीचे केक कापून करण्याचा ट्रेंड नव्याने रुजू होत असल्याने केक शॉप, मिठाईच्या दुकानांवर दिवसभर नागरिकांची गर्दी पाहावयास मिळाली.

वेलकम २०२१ अशा आशयाचे केक नागरिकांनी खरेदी केले.  संचारबंदीमुळे सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे तळीरामांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचे दिसून आले. पनवेलमधील खारघर हिल, माचीप्रबळसारख्या नैसर्गिक पर्यटनस्थळांवरही पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे.

मार्गशीर्ष गुरुवारमुळे अडचणी वाढल्या
मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी ३१ डिसेंबर आल्याने अनेकांनी शाकाहारीच बेत आखल्याचे दिसून आले. अनेकांचा उपवास असल्याने साबुदाणे वडे, थालीपीठ असे प्रकार होते. तर हॉटेलमध्येही शाकाहारी पदार्थांना जास्त मागणी होती. रात्री बारानंतर अनेकांनी मांसाहारी पदार्थ मागविल्याची प्रतिक्रिया एका हॉटेलचालकाने दिली.

संचारबंदीमुळे ४ पेक्षा जास्त जण एकत्र येण्यास मज्जाव आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगून कायदा सुरक्षेचे भान राखले पाहिजे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून पनवेल, उरण परिसरात एक हजार पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत.
- शिवराज पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ २

Web Title: Citizens of Panvel prefer terrace parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.