Citizens crowd in Navi Mumbai to buy onion in cheap rate; 1 thousand kg allotted by MNS | स्वस्त दरातील कांदा खरेदीसाठी नवी मुंबईत नागरिकांची गर्दी; मनसेकडून १ हजार किलो वाटप 
स्वस्त दरातील कांदा खरेदीसाठी नवी मुंबईत नागरिकांची गर्दी; मनसेकडून १ हजार किलो वाटप 

नवी मुंबई - अवकाळी पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किंमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. २० - ३० रुपये किलोने विकला जाणारा कांदा थेट १०० ते १५० रुपये किलोवर पोहोचल्याने सामान्यांचे बजेट पुरते कोलमडले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी मनसेकडून सानपाडा येथे कांदा विक्री सुरु करण्यात आली. 

मनसेचे सुरेश मढवी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी ४० रुपये किलो अशा स्वस्त दरात १००० किलो कांदा वाटप करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राबविलेल्या या उपक्रमाला सानपाडा विभागातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे, विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांच्यासह अनेक मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

नवीन कांदा बाजारात आल्याने देशभरात उसळी घेतलेले कांद्याचे दर आता वेगाने खाली येऊ लागले आहेत. राज्यातील इतर बाजार समित्यांप्रमाणे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याच्या दराची घसरण सुरू झाली आहे. मंगळवारी निघालेल्या सौद्यात १० किलोंचा दर सरासरी ४०० रुपये झाला. चार दिवसांपूर्वी हाच दर १००० रुपयांवर गेला होता. समितीत येणाऱ्या कांद्याच्या आवकेतही दुपटीने वाढ झाल्याने दरात घसरण झाल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

कोल्हापुरात घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याच्या वाढलेल्या दराने गेल्या काही वर्षांतील उच्चांक नोंदविला होता. किमान ७० ते १५० रुपये किलोप्रमाणे कांदा विकत घ्यावा लागत होता. वाढलेल्या दराचे पडसाद घरासह हॉटेलमधील जेवण व नाष्ट्यावरही पडलेले दिसत होते. वाढलेल्या दराचीच सर्वत्र चर्चा होत होती.

कांद्याच्या वाढत्या दरांचा मुद्दा देशभरात गाजताना दिसत होता. संसदेत कांद्यानं वातावरण तापवल्यावर आता हा विषय निवडणूक प्रचारातही आला आहे. मी फार कांदा खात नाही, असं म्हणणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही काय खाता, हे कोणी विचारलंय का, असा सवाल राहुल यांनी सीतारामन यांचा विचारला आहे.
 

Web Title: Citizens crowd in Navi Mumbai to buy onion in cheap rate; 1 thousand kg allotted by MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.