सिडकोचा गृहप्रकल्प : ९५ टक्के कागदपत्रांची पडताळणी झाली पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 02:51 IST2019-05-09T02:51:53+5:302019-05-09T02:51:57+5:30
सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची जलदगतीने पडताळणी करण्याच्या दृष्टीने सिडकोने ‘निवारा’ हे पोस्ट लॉटरी संकेतस्थळ तयार केले आहे.

सिडकोचा गृहप्रकल्प : ९५ टक्के कागदपत्रांची पडताळणी झाली पूर्ण
नवी मुंबई - सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची जलदगतीने पडताळणी करण्याच्या दृष्टीने सिडकोने ‘निवारा’ हे पोस्ट लॉटरी संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळाला अर्जदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन महिन्यांत जवळपास ९५ टक्के अर्जदारांनी आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून घेतली आहे.
सिडकोच्या माध्यमातून आॅगस्ट २०१८ मध्ये १४,८३८ घरांसाठी सोडतील यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे अॅक्सिस बँकेच्या संबंधित शाखांत जमा करण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. प्राप्त झालेल्या या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी मार्च महिन्यात निवारा हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले. अर्जदारांना कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ई-मेल, फोन तसेच एसएमएसद्वारे वेळ दिली जाते.
दरम्यान, मागील दोन महिन्यांत या योजनेला अर्जदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यानुसार एकूण यशस्वी ठरलेल्यांपैकी सुमारे ९५ टक्के अर्जदारांनी या योजनेअंतर्गत आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून घेतली आहे. सध्या ७०० ते ८०० अर्जांची पडताळणी शिल्लक आहे. १५ मेपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठीची अंतिम मुदत आहे.