नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 10:49 IST2025-11-18T10:48:42+5:302025-11-18T10:49:19+5:30
जर कुणाला वाटत असेल की हे स्मारक आम्ही पुन्हा खुले करू शकत नाही तर परत एकदा आम्ही गनिमी काव्याने हे स्मारक उघडू असा इशारा मनसेने दिला आहे.

नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
नवी मुंबई - मनसे नेते अमित ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच नवी मुंबईत एक आंदोलन हाती घेत ४ महिने धूळखात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण केले. अमित ठाकरे यांनी हा पुतळा पाण्याने स्वच्छ करत त्यावर हार घालत अभिवादन केले. यावरून अमित ठाकरे यांच्यासह ७० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा महापालिका प्रशासनाने हा पुतळा झाकून ठेवला आहे. त्यावरून मनसेने संतप्त भूमिका घेतली आहे.
मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे म्हणाले की, चोर दरोडेखोरांसारखे पोलीस बंदोबस्तात येऊन मध्यरात्री ३ वाजता नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक १५ फुटी जाळी लावून बंदीस्त करण्याचं पाप महापालिका प्रशासनाने केले आहे. हे स्मारक खुले केल्यानंतर त्याला बंदिस्त करण्याची गरजच काय, हे कुणाच्या सांगण्यावरून सुरू आहे हे कळायला नवी मुंबईतील जनता दुधखुळी नाही. नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासनाने जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. गेले ४ महिने हे स्मारक धूळखात होते, त्याचे अनावरण अमित ठाकरे यांनी केले म्हणून कुणाच्या पोटात दुखू लागलं आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच जर कुणाला वाटत असेल की हे स्मारक आम्ही पुन्हा खुले करू शकत नाही तर परत एकदा आम्ही गनिमी काव्याने हे स्मारक उघडू. या सरकारने तमाम शिवभक्त, शिवप्रेमींची भावना दुखावण्याचं काम केले आहे. आगामी काळात शिवप्रेमी पालिका प्रशासन आणि सरकारला माफ करणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे अशी संतप्त भूमिकाही शहराध्यक्ष गजानन काळे यांनी घेतली आहे.
गुन्हा दाखल झाल्यावर काय म्हणाले होते अमित ठाकरे?
शिवरायांचे स्मारक खुले केल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावर अमित ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्या राजकीय प्रवासात महाराजांसाठी माझ्यावर पहिला गुन्हा दाखल झाला त्याबद्दल मला आनंद आहे. मी शाखा उद्घाटनासाठी गेलो होतो. तेव्हा मला नेरूळ येथील स्मारकाबाबत कळले. गेल्या ४ महिन्यापासून हे स्मारक धुळखात होते. आम्ही हे पाहिले तेव्हाच तातडीने ते अनावरण करण्याचा निर्णय घेतला. महाराजांसाठी प्रत्येक मराठी माणूस पेटून उठतो. त्यामुळे गुन्हा दाखल झाला त्याचे काही वाटत नाही. महाराजांचा पुतळा अनावरण करण्यासाठी या नेत्यांना वेळ नाही? मंत्री, नेत्यांना वेळ मिळत नाही म्हणून फडका बांधून ठेवणार हे योग्य नाही असं अमित ठाकरे यांनी म्हटलं.