घणसोलीतील सेंट्रल पार्क रखडले

By Admin | Updated: June 5, 2017 02:46 IST2017-06-05T02:46:36+5:302017-06-05T02:46:36+5:30

महापालिकेतर्फे घणसोलीत सुरूअसलेले सेंट्रल पार्कचे काम प्रशासनाच्या अनास्थेमुळे रखडले आहे.

Central Park of Ghansoli was stuck | घणसोलीतील सेंट्रल पार्क रखडले

घणसोलीतील सेंट्रल पार्क रखडले

सूर्यकांत वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिकेतर्फे घणसोलीत सुरूअसलेले सेंट्रल पार्कचे काम प्रशासनाच्या अनास्थेमुळे रखडले आहे. पहिल्या टप्प्याच्या कामाची मुदत संपली, तरीही पार्कचा आराखडा केवळ कागदावरच आहे. अनेक प्रकारांमुळे पार्कच्या आराखड्यात दोनदा झालेला असून अद्याप त्यावर आयुक्तांची स्वाक्षरी झालेली नाही.
घणसोली सेक्टर-३ येथील सावली गाव हटवून महापालिकेने त्या ठिकाणी सेंट्रल पार्कचे काम हाती घेतले आहे; परंतु कामाला सुरुवात होऊन तीन वर्षे उलटूनही पार्क अद्यापही केवळ कागदावरच आहे. मुळात हा भूखंड पालिकेकडे हस्तांतर झालेला नसताना पालिकेने वर्कआॅर्डर काढली होती. अशातच सिडकोने भूखंडाचा काही भाग वगळून उर्वरित भूखंड पालिकेला हस्तांतरण करून घेण्याचे सुचवले; परंतु मूळ भूखंडाच्या क्षेत्रफळानुसार पार्कचा आराखडा करून कामाला सुरुवात झालेली असल्यामुळे वगळलेल्या भूखंडासह संपूर्ण भूखंड मिळावा, यासाठी पालिकेने सिडकोकडे अनेक प्रयत्न केले. याचदरम्यान पालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागल्यानंतर त्यांनीही यासाठी प्रयत्न केले. अखेर वर्कआॅर्डर काढल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी घणसोली नोडसह सेंट्रल पार्कच्या भूखंडाचेही हस्तांतरण झाले. मात्र, या वेळी सिडकोने एकूण ४४ हजार १२४.९२ चौ.मी. क्षेत्रफळापैकी सुमारे ५८०० चौ.मी.चा भूखंड वगळूनच उर्वरित भूखंड महापालिकेला पार्कसाठी हस्तांतर केला. त्यामुळे पार्कच्या भूखंडाच्या क्षेत्रफळात झालेल्या बदलामुळे नवा आराखडा तयार करून नव्याने काम सुरू झाले होते. अशातच मुंढे यांनी प्रत्यक्ष पार्कच्या जागेची पाहणी करून काही बदल सुचवले होते. त्यांनी सुचवलेल्या बदलानुसार दुसऱ्यांदा पार्कचा आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पाठवण्यात आला. याच वेळी ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमादरम्यान निश्चित मुदतीतच पार्कचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन त्यांनी घणसोलीकरांना दिले होते; परंतु त्यांच्याकडून सुधारित आराखड्यावर निर्णय प्रलंबित असतानाच त्यांची बदली झाली. यानंतर नवे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनीही त्याकडे लक्ष दिलेले नाही. यामुळे पार्कच्या आराखड्याचे घोंगडे चार महिन्यांपासून निर्णयाच्या प्रतीक्षेत भिजत पडले आहे. अशातच ३१ मे रोजी पार्कच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची मुदत संपलेली आहे. प्रशासनाच्या अनास्थेमुळे मागील तीन वर्षांत त्या ठिकाणी फक्त प्रवेशद्वाराचे निम्याहून अधिक काम झाले आहे. त्याशिवाय जॉगिंग ट्रॅक व तलावाचे अर्धवट खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला मुदतवाढ देण्याशिवाय प्रशासनाला गत्यंतर नाही. शिवाय खर्चाच्या रकमेतही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पार्कच्या कामाची सद्यस्थितीची गती पाहता ते पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
>ठळक घटनाक्रम
सेंट्रल पार्कच्या नावाखाली सावली गाव हटवले. भूखंडाचे हस्तांतरण नसताही पालिकेने वर्कआॅर्डर काढली. गाव हटवल्यानंतर सहा वर्षांनी पार्कच्या कामाला सुरुवात. सिडकोने मूळ भूखंडाचा काही भाग वगळून केले हस्तांतरण. भूखंडाच्या क्षेत्रफळात बदल झाल्याने नवा आराखडा.
आयुक्तांच्या स्वाक्षरीअभावी आराखडा कागदावरच.
घणसोलीकर गेली १५ वर्षे उद्याने, मैदाने अशा मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहेत. नोडचे हस्तांतरण झाले नसल्याच्या कारणावरून पालिका नोडकडे दुर्लक्ष करत होती. तर सिडकोने घणसोलीतील विकासकामे वाऱ्यावर सोडून इतर ठिकाणी लक्ष केंद्रित केले होते. यामुळे चांगली उद्याने, खेळाची मैदाने यापासून घणसोलीकर वंचित राहिले आहेत.
सेंट्रल पार्कचे काम सुरू झाल्याने रहिवाशांना विरंगुळ्यासाठी चांगले उद्यान उपलब्ध होणार होते. मात्र, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पार्कचे काम रखडले असून ते पूर्ण होण्यास अजून एका वर्षाहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Central Park of Ghansoli was stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.