"गाडीत बस, तुझ्याशी बोलायचं आहे"; रिव्हॉल्व्हर दाखवून महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न, नवी मुंबईतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 15:22 IST2025-07-01T15:17:34+5:302025-07-01T15:22:54+5:30
नवी मुंबईत महिलेला पिस्तुल दाखवून धमकावणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

"गाडीत बस, तुझ्याशी बोलायचं आहे"; रिव्हॉल्व्हर दाखवून महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न, नवी मुंबईतील प्रकार
Navi Mumbai Crime:नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईत एका ४० वर्षीय व्यक्तीने एका महिलेचा विनयभंग करत तिला बंदुकीने धमकावलं. महिलेच्या तक्रारीवरून, तळोजा पोलिसांनी शनिवारी आरोपी कुंदन नेटकेविरुद्ध विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार, २८ जून रोजी दुपारी मेट्रो स्टेशनला जाताना आरोपीने तिला अडवले. आरोपीने महिलेशी काहीतरी बोलायचे असल्याने तिला त्याच्या गाडीत बसण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिच्याकडे लैंगिक संबंधाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यावर, नेटकेने बंदूक काढून तिला धमकावले. मात्र महिला घाबरली आणि तिथून कशीतरी पळून जाण्यास यशस्वी झाली. त्यानंतर महिलेने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आरोपीने महिलेला रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावल्याचेही समोर आलं आहे.
अशातच नवी मुंबईत सोमवारी असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर एका महिलेचा लैंगिक छळ केल्याबद्दल एका ३० वर्षीय ऑटोरिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पनवेलमधील विचुंबे येथील रहिवासी रोहित गोपाल गाडे याला भारतीय दंड संहितेच्या कलम ७४ आणि कलम ७५ अंतर्गत अटक केली.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती एका मैत्रिणीसोबत चालत असताना ऑटोरिक्षा चालकाने त्यांना धडक दिली, त्यानंतर तिचा आरोपींशी वाद झाला. त्यानंतर गाडे गाडीतून उतरला, पीडितेला ओढले, तिला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि चाकूने हल्ला करण्याची धमकी दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला शोधून काढत अटक केली.