उद्याेग, व्यवसायांसह रिअल इस्टेट क्षेत्रही घेणार गगनभरारी
By कमलाकर कांबळे | Updated: October 8, 2025 09:34 IST2025-10-08T09:33:47+5:302025-10-08T09:34:07+5:30
रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, विमानतळामुळे नवी मुंबईचे जागतिक नकाशावर स्थान अधिक बळकट होणार आहे. मुंबईत वाढती लोकसंख्या आणि कमी जागा लक्षात घेता गुंतवणूकदारांची पावले नवी मुंबईकडे वळतील.

उद्याेग, व्यवसायांसह रिअल इस्टेट क्षेत्रही घेणार गगनभरारी
- कमलाकर कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे रिअल इस्टेट मार्केटला बूस्टर मिळेल, घरांच्या किमतीत लक्षणीय वाढ होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. नवी मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील उद्योग-व्यवसायांना नवी भरारी मिळणार आहे. या बदलाचा सर्वाधिक ठसा बांधकाम व्यवसायावर उमटणार असून, निवासी, व्यावसायिक व औद्योगिक रिअल इस्टेट प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
उलवे, खारकोपर, द्रोणागिरी, पनवेल, कोपरखैरणे, तळोजा या परिसरात घरांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
टॉवर, ऑफिस संकुले, हॉटेल्स, मॉल्स उभारणीस चालना
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निमित्ताने बहुराष्ट्रीय कंपन्या व गुंतवणूकदार नवी मुंबईकडे वळतील. यामुळे उलवे, बेलापूर, वाशी या नोड्समध्ये उंच व्यावसायिक टॉवर, कार्यालयीन संकुले, हॉटेल्स आणि मॉल्स उभारणीस चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, सिमेंट, स्टील, टाइल्स, रंग, इलेक्ट्रिकल, फर्निचर यांसारख्या उद्योगांची उलाढाल वाढणार आहे.
गुंतवणूकदार वाढणार
रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, विमानतळामुळे नवी मुंबईचे जागतिक नकाशावर स्थान अधिक बळकट होणार आहे. मुंबईत वाढती लोकसंख्या आणि कमी जागा लक्षात घेता गुंतवणूकदारांची पावले नवी मुंबईकडे वळतील.
गेल्या दीड दशकात विमानतळाच्या नावाने जमिनी व घरांच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांना खिंडार पडले आहे. आता विमानतळ सुरू होत आहे. त्यामुळे घरांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
प्रकाश बाविस्कर, सचिव, मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघ, महाराष्ट्र