नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 11:50 IST2025-07-21T11:49:13+5:302025-07-21T11:50:16+5:30

मनसेने याठिकाणी येऊन तोडफोड करावी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी भाजपाने हा डाव खेळला असल्याचा आरोप मनसेने केला आहे. 

BJP MLA Virendrasinh Jadeja in Navi Mumbai mocks MNS; removes Marathi placard and puts it in Gujarati | नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली

नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली

नवी मुंबई - राज्यात मराठी आणि हिंदी असा वाद पेटला असताना दुसरीकडे भाजपा आमदाराने मनसेला डिवचण्याचं काम केले आहे. नवी मुंबईत गुजरातमधील एका भाजपा आमदाराने कार्यालयावरील पाटी गुजराती भाषेत लावली होती. त्याला मनसेसहमराठी भाषिकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर ही पाटी तात्काळ बदलण्यात आली. गुजरातीत लावलेली पाटी मराठीत करण्यात आली. परंतु पुन्हा एकदा मराठी भाषा काढून त्यावर गुजराती भाषेत फलक लावण्यात आले आहे त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईच्या सीवूड येथे गुजरातच्या रायर विधानसभेचे भाजपा आमदार विरेंद्रसिंह बहादूरसिंह जाडेजा यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयावरील पाटी गुजराती भाषेत असल्याने इथल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाटी मराठी भाषेत करावी अशी विनंती केली होती. त्यानंतर ही पाटी मराठी भाषेत लावण्यात आली. मात्र काही तासांतच पुन्हा मराठी भाषेला डावलून भाजपा आमदाराने गुजराती भाषेत पाटी लावली. त्यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. 

या प्रकरणी मनसेचे स्थानिक कार्यकर्ते म्हणाले की, हे भाजपाचे आमदार आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. नवी मुंबईतील वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत. संबंधितांना अटक करावी आणि ती पाटी पुन्हा मराठी भाषेत करावी. जर ते नाही झाले तर मनसे स्टाईलने आम्हाला जे करायचे ते करू असं त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, गुजरातमधील भाजपाचे आमदार असलेले जाडेजा यांनी नवी मुंबईत पक्ष कार्यालय थाटले आहे. त्यांच्या कार्यालयावरील पाटी गुजराती भाषेत होती. मात्र तिथल्या स्थानिकांनी यावर आक्षेप घेतला. मनसेनेही याची दखल घेत मराठी भाषेत पाटी लावण्यास सांगितले. त्यानंतर १८ जुलैला या कार्यालयावरील पाटी मराठीत करण्यात आली. परंतु अवघ्या २ दिवसांत पुन्हा ही पाटी गुजराती भाषेत करण्यात आली. भाजपाने इथल्या मराठी भाषिकांना जाणीवपूर्वक डिवचण्याचं काम यातून केले. मनसेने याठिकाणी येऊन तोडफोड करावी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी भाजपाने हा डाव खेळला असल्याचा आरोप मनसेने केला आहे. 

Web Title: BJP MLA Virendrasinh Jadeja in Navi Mumbai mocks MNS; removes Marathi placard and puts it in Gujarati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.