आकर्षक क्रमांकाने मिळवून दिला कोट्यवधींचा महसूल; एक क्रमांकासाठी चार लाखांचे शुल्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 12:14 AM2020-01-18T00:14:41+5:302020-01-18T00:15:04+5:30

आरटीओची चार कोटी ६१ लाखांची वसुली

Billions of revenue generated by attractive numbers; Charges four lakh for number one | आकर्षक क्रमांकाने मिळवून दिला कोट्यवधींचा महसूल; एक क्रमांकासाठी चार लाखांचे शुल्क

आकर्षक क्रमांकाने मिळवून दिला कोट्यवधींचा महसूल; एक क्रमांकासाठी चार लाखांचे शुल्क

Next

मयूर तांबडे

पनवेल : पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाला २०१९ या वर्षात आकर्षक क्रमांकातून तब्बल चार कोटी ६१ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकाकडून सात कोटी ९६ लाख ५२ हजार ६६३ इतक्या रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान प्रादेशिक परिवहन विभागाने सहा हजार ७९३ वाहनांवर कारवाई केली. यात दुचाकी, चारचाकी, ट्रेलर, ट्रक, टेम्पो, रिक्षा आदीचा समावेश आहे. तर ८३२ गाड्या कागदपत्रे पूर्ण नसल्याने वा अन्य करणामुळे जमा करण्यात आल्या आहेत. अशा वाहनचालकांकडून तब्बल सात कोटी ९७ लाख ५२ हजार ६६३ रुपयांचा दंड वसूल केला आहे व सहा कोटी ९२ लाख ५१ हजार १२१ रुपयांचा कर असा एकूण १४ कोटी ८९ लाख तीन हजार ७८४ रुपयांचा दंड व कर घेण्यात आला.

पनवेल शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. यात दुचाकी वाहनांची संख्या लक्षणीय आहे. आपल्या गाडीपेक्षा गाडीचा नंबर लक्षवेधी असावा, याकडे अनेकांचा कल असतो. तर एकाच घरात एकाच क्रमांकाच्या गाड्या असल्याचेही प्रकार दिसून येत आहेत. या आकर्षक क्रमांकाचा फायदा प्रादेशिक परिवहन विभागाला होतो. त्यामुळे गाडी रजिस्टर करताना आरटीओ विभागात अतिरिक्त शुल्क मोजून हवा असलेला, व्हीआयपी क्रमांक घेण्यासाठी वाहनधारकांची रीघ लागलेली असते.
गेल्या वर्षभरात व्हीआयपी क्रमांकातून आरटीओला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये चार कोटी ६१ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा महसूल याअंतर्गत मिळाला आहे. यावर्षी १५ इम्पोर्टेड गाड्यांची खरेदी करण्यात आली असून, दोन कोटी ३८ लाखांच्या गाडीची खरेदीही पनवेलमध्ये करण्यात आली आहे.

नवी मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळ, मेट्रो, सेझ, उरण-जेएनपीटीचा झपाट्याने होत असलेला विकास आणि वर्दळीसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून पनवेलला सध्या पसंती मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प होऊ घातले आहेत. शहरवासीयांचे राहणीमान उंचावले असून, त्याचप्रमाणे नवनवीन महागड्या गाड्याही शहरात मोठ्या संख्येने धावताना दिसत आहेत.

दर महिन्याला वाहनांच्या संख्येत वाढ होत असते. पनवेलमध्ये सद्यस्थितीत दोन लाख ७५ हजार १६१ दुचाकी, एक लाख २५ हजार ५६ चारचाकी, ३२ हजार ३१० तीन चाकीरिक्षा, १२ हजार ७९० टुरिस्ट वाहने, दोन हजार ६५५ बसेस, ७२ हजार २९४ ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ३,३०३ जेसीबी, पोकलेन आदी वाहनांची नोंद आहे. पनवेल परिसरात वाढू लागलेल्या वाहनांच्या संख्येमुळे प्रादेशिक परिवहन विभाग मालामाल होत असून दरवर्षी कोट्यवधींचा महसूल मिळवत आहे.

पनवेलच्या नागरिकांना यापूर्वी पेण येथील प्रादेशिक परिवहन विभागात जावे लागत असे. २०१० पासून पनवेल येथे प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले. ४ नोव्हेंबर २०१० पासून ते ३१ डिसेंबर २०१९ या नऊ वर्षांत पनवेल येथील आरटीओमध्ये पाच लाख २३ हजार ५६९ गाड्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

हल्ली आकर्षक क्रमांकाला चालकांकडून मागणी असून, त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यास त्यांची तयारी असते. त्यामुळे आरटीओच्या महसुलातही मोठी वाढ होत आहे. याशिवाय फ्लाइंग स्कॉड सतर्क असल्याने वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर वर्षभर कारवाई सुरू असते. - हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

यंदा जवळपास १५ इम्पोर्टेड गाड्यांची खरेदी करण्यात आली असून, दोन कोटी ३८ लाखांच्या गाडीची खरेदीही पनवेलमध्ये करण्यात आली आहे. वाहनांच्या १ या क्रमांकासाठी आधी एक लाख रुपये इतके शुल्क घेतले जायचे. मात्र, आता हेच शुल्क चार लाख रुपये इतके करण्यात आले आहे. यंदा एका गाडीला १ क्रमांक देण्यात आला असून त्यासाठी चार लाख रुपये घेण्यात आले आहेत.

Web Title: Billions of revenue generated by attractive numbers; Charges four lakh for number one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल