Bank robbery in Navi Mumbai, incident in lockdown has created a stir in the area | नवी मुंबईत बँकेवर दरोडा, लॉकडाऊनमध्ये दिवसाढवळ्या लुटीने खळबळ

नवी मुंबईत बँकेवर दरोडा, लॉकडाऊनमध्ये दिवसाढवळ्या लुटीने खळबळ

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई - कोपर खैरणे येथील सारस्वत बँकेवर दरोडा पडल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. बँकेत आलेल्या दोघा व्यक्तींनी चाकूच्या धाकावर लॉकर मधील सुमारे साडेचार लाखाची रोकड पळवली आहे. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कोपर खैरणे सेक्टर 19 येथील सारस्वत बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला. दुपारच्या सुमारास बँकेत 6 ते 7 कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बँकेत आलेल्या दोघांनी एका कर्मचाऱ्याला चाकूच्या धाकावर धरले. त्यानंतर लॉकर रूम उघडायला लावून त्यामधील सुमारे साडेचार लाख रुपये लुटून पळ काढला. या घटनेनंतर बँक कर्मचाऱ्यांनी पोलीस कंट्रोल ला कळवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

बँकेत आलेले दोघेही 30 ते 35 वयोगटातील होते. शिवाय तोंडाला मास्क देखील लावलेले होते. तर हाताचे ठसे उमटू नयेत याकरिता देखील हातात ग्लोज घातलेले होते. दरम्यान लॉकडाऊनच्या अनुशंघाने शहरात तसेच कोपर खैरणे परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनांची झाडाझडती घेतली जात आहे. यानंतरही सदर दोघा लुटारूंनी बँक लुटल्यानंतर शहराबाहेर पळ काढला कसा असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तर भरदिवसा चाकूच्या धाकावर बँक लुटल्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाय पोलिसांचाही नाकाबंदीची पोलखोल झाली आहे. या दोघांनी अगोदर बँकेची रेकी करून दरोडा टाकल्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी कोपर खैरणे पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Bank robbery in Navi Mumbai, incident in lockdown has created a stir in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.