‘उत्तन-विरार सी लिंक’साठी तब्बल १०० हेक्टर खारफुटीचा जाणार बळी
By नारायण जाधव | Updated: March 22, 2026 07:53 IST2026-03-22T07:52:05+5:302026-03-22T07:53:02+5:30
केंद्रीय परिवेश समितीची मिळाली मंजुरी : प्रकल्पासाठी ८७,४२७.१७ कोटींचा खर्च प्रस्तावित.

‘उत्तन-विरार सी लिंक’साठी तब्बल १०० हेक्टर खारफुटीचा जाणार बळी
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या महत्त्वाकांक्षी उत्तन-विरार सी-लिंक प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाच्या परिवेश समितीने ११ मार्चच्या ४३९ व्या बैठकीत मंजुरी दिली आहे. प्रकल्पासाठी रुपये ८७,४२७.१७ कोटींचा खर्च प्रस्तावित असून, यात मुख्य समुद्री पूल, ॲप्रोच रस्ते, इंटरचेंजेस, जमीन संपादन व पुनर्वसनाचा समावेश आहे. या सी लिंकसाठी तब्बल १०० हेक्टर खारफुटीचा बळी जाणार आहे.
या प्रकल्पामुळे सध्या ९० मिनिटांहून अधिक लागणारा प्रवास ३०-४० मिनिटांवर येईल. प्रकल्पाची एकूण लांबी ५५.१२ किमी असून, त्यात उत्तन ते विरारदरम्यान २४.३५ किमीचा ४ ४ पदरी मुख्य समुद्री पूल पूर्णपणे एलिव्हेटेड स्वरूपात असेल. उत्तन (मीरा-भाईंदर) कनेक्टर (३ ३ लेन) ९.३२ किमी लांबीचा आहे. त्यात ६.३ किमी एलिव्हेटेड, १.८९५ किमी ॲट-ग्रेड व १.१२४ किमी बोगदा असेल. वसई कनेक्टर २.५ किमी पूर्णपणे एलिव्हेटेड राहील. तर विरार कनेक्टर (३ ३ लेन) १८.९५ किमी लांबीचा असून त्यात १२.८७ किमी एलिव्हेटेड, ५.७५ किमी ॲट-ग्रेड व ०.३३ किमी बोगदा असेल.
४० हेक्टर वनजमीनसुद्धा बाधित
पर्यावरणीय दृष्टीने प्रकल्प संवेदनशील ठरत असून सुमारे ७० ते १०० हेक्टर खारफुटी क्षेत्र बाधित होण्याची शक्यता आहे. याशिवाय ३० ते ४० हेक्टर वनजमीन वापरावी लागणार असून सुमारे ४ ते ६ हजार झाडांची तोड अपेक्षित आहे. पिलर्स, ॲप्रोच रस्ते व इंटरचेंजेसमुळे खारफुटीवर थेट व अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे.
नुकसानभरपाईसाठी खारफुटीचे १:३ प्रमाणात पुन:लागवड, पर्यायी ठिकाणी मँग्रोव्ह क्षेत्र विकसित करणे, तसेच प्रत्येक झाडाच्या बदल्यात ३ ते ५ झाडे लावण्याचे नियोजन आहे. समुद्रातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवण्यासाठी एलिव्हेटेड डिझाइनचा अवलंब केला जाईल. तुंगारेश्वर अभयारण्यातील ४.६१६८ हेक्टर राखीव वनक्षेत्र प्रभावित होणार असून वन्यजीव संवर्धनाचे मोठे आव्हान आहे.
थोडक्यात प्रकल्प
लांबी : ५५.१२ किमी
मुख्य सी-लिंक : २४.३५ किमी
खारफुटी ७०–१०० हेक्टर
वनजमीन ३०–४० हेक्टर
झाडे ४–६ हजार
इंटरचेंज ३–४