कामगाराकडूनच व्यापाऱ्याची दिड कोटीची फसवणूक, मालाचा केला अपहार
By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 21, 2023 19:13 IST2023-02-21T19:13:11+5:302023-02-21T19:13:39+5:30
नवी मुंबईत कामगाराकडूनच व्यापाऱ्याची दिड कोटीची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

कामगाराकडूनच व्यापाऱ्याची दिड कोटीची फसवणूक, मालाचा केला अपहार
नवी मुंबई : व्यापाऱ्याने दुबईत नेमलेल्या प्रतिनिधिनेच दिड कोटींचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरुळ येथील व्यापारी देवधर पांडे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांचा कृषी मालाचा निर्यातीचा व्यवसाय असून यासाठी त्यांनी वेगवेगळ्या देशात व्यवहार हाताळण्यासाठी प्रतिनिधी नेमले आहेत.
त्यानुसार अमरावतीच्या प्रसन्ना देशपांडे याची दुबईत व्यवहार सांभाळण्यासाठी नेमणूक केली होती. त्याठिकाणी तीन कंपन्यांना माल पुरवून त्यांच्या बिलाची वसुली केली जायची. दरम्यान दोन वर्षांपूर्वी पांडे यांनी देशपांडेच्या मागणीनुसार तीन कंपन्यांसाठी दिड कोटींचा माल पाठवला होता. मात्र त्याच्या बिलाची रक्कम मिळण्यास टाळाटाळ होत असल्याने पांडे यांनी प्रत्यक्ष दुबईत जाऊन चौकशी केली. त्यामध्ये दुबईत पाठवलेला माल ठरलेल्या कंपन्यांना न वितरित करता परस्पर दुसऱ्याच व्यापाऱ्यांना विकून त्याच्या बिलाची रक्कम देशपांडे याने स्वतःकडे घेतल्याचे समोर आले. दरम्यान हडप केलेली ही रक्कम परत करण्यासाठी त्याला मुदत देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही रक्कम परत केली जात नसल्याने पांडे यांनी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.