भाजपाविरोधात सर्वपक्षीय आघाडी, सोनारीत २४ फेब्रुवारीला निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 03:38 IST2019-02-08T03:38:23+5:302019-02-08T03:38:45+5:30
उरण तालुक्यातील सोनारी ग्रा.पं.मध्ये भाजपाविरोधात शिवसेना, शेकाप, मनसे आदी सर्वपक्षीय आघाडी अशी लढत होणार आहे.

भाजपाविरोधात सर्वपक्षीय आघाडी, सोनारीत २४ फेब्रुवारीला निवडणूक
उरण : तालुक्यातील सोनारी ग्रा.पं.मध्ये भाजपाविरोधात शिवसेना, शेकाप, मनसे आदी सर्वपक्षीय आघाडी अशी लढत होणार आहे. बुधवारी भाजपाच्या तर गुरुवारी आघाडीच्या उमेदवारांनी शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने भाजपाविरोधात सर्वपक्षीय आघाडी अशा सरळ लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायतीत नऊ सदस्य संख्या आणि थेट सरपंच अशा दहा जागांसाठी ही निवडणूक २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाविरोधात सर्वपक्षीय आघाडी अशी थेट लढत होत आहे.
सर्वपक्षीय आघाडीतून सरपंचपदासाठी शिवसेनेच्या सुजाता कडू यांनी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपाकडून पूनम कडू यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी भाजपाचे तालुकाप्रमुख रवि भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नगरसेवक कौशिक शहा, सोनारीचे माजी सरपंच महेश कडू आदी उपस्थित होते.
भाजपाच्या ग्रा.पं.च्या नऊ जागांसाठी सेना चार, शेकाप तीन आणि मनसे दोन अशा नऊ जागांची विभागणी करण्यात आल्याची माहिती सोनारी शाखाप्रमुख नारायण तांडेल यांनी दिली.
गुरुवारी भाजपाविरोधात आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या वेळी तालुकाप्रमुख संतोष घरत, जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख रमेश म्हात्रे, घारापुरी सरपंच बाळाराम ठाकूर, सोनारी माजी सरपंच रोहिदास पाटील, शाखाप्रमुख नारायण तांडेल, शेकापचे तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल, उरण पं. स. उपसभापती वैशाली पाटील, नाहिदा ठाकूर, मनसेचे अजय तांडेल, सुनील भोईर, शहरप्रमुख जयंत गांगण आणि आघाडीचे सर्व शिवसैनिक उपस्थित होते. सेनेचा एक गट भाजपाच्या गटात सामील झाला आहे, त्यामुळे भाजपाकडून सेना सोबत असल्याचा अपप्रचार केला जात आहे.