इंडिया वनच्या लँडिंगनंतर विमानतळाचे उद्घाटन; पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 09:28 IST2025-10-04T09:27:46+5:302025-10-04T09:28:59+5:30
सिडको आणि अदानी विमानतळ कंपनीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची जय्यत तयारी चालविली आहे.

इंडिया वनच्या लँडिंगनंतर विमानतळाचे उद्घाटन; पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी
नवी मुंबई : सिडको आणि अदानी विमानतळ कंपनीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची जय्यत तयारी चालविली आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी स्वत: या विमानतळाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी युद्धपातळीवर राहिलेली कामे पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (एनएमआयए) भव्य ‘इंडिया वन’ विमानाने येऊन नव्या विमानतळाचे ८ किंवा ९ ऑक्टोबर रोजी उद्घाटन करतील, सांगण्यात येत आहे.
बुधवारी व्हीव्हीआयपी एअर इंडियाच्या बोइंग विमानाने नवी मुंबई विमानतळावर लँडिंग चाचणी घेतली. डिसेंबरमध्ये इंडिगोने नॅरोबॉडी एअरबस ए ३२० सह चाचणी उड्डाण केल्यानंतर, एनएमआयए येथे वाइडबॉडी विमानाचे आगमन होण्याची ही पहिलीच घटना होती. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी चालवलेले व्हीव्हीआयपी विमान बुधवारी सकाळी १०:३० वाजता उतरले आणि दुपारी २ वाजता पुन्हा दिल्लीला रवाना झाले, यादरम्यान अधिकाऱ्यांनी सर्व लँडिंग आणि टेक-ऑफ आवश्यकता पूर्ण केल्याची खात्री केली.
अशी आहे धावपट्टी
अब्जावधी डॉलर्सचे विमान भारतीय पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींसाठी बनवलेल्या दोन कस्टम-मेड व्हीव्हीआयपी बोइंग-७७७ विमानांपैकी एक आहे. नवी मुंबई विमानतळासह येथील धावपट्टीची रचना ही जगातील मोठी आणि रुंद पंखे असलेली विमाने उतरतील, अशा पद्धतीने केलेली आहे.
दिशादर्शक फलक लागले
विमानतळ परिसरातील रस्त्यांची डागडुजी, खड्डे बुजविण्यासह विमानतळावर ये-जा करणे सोपे व्हावे यासाठी दिशादर्शक फलक लावण्यासह इतर तत्सम कामे करण्यात येत आहेत. अटल सेतूसह बेलापूर-उरण, पनवेल -जेएनपीएकडे जाणारे रस्ते हे सध्या या विमातळावर येण्या-जाण्यासाठीचे प्रमुख मार्ग आहेत.