- नारायण बडगुजरपिंपरी - अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभर बिना प्रिस्क्रिप्शन कफ सिरप विकणाऱ्या आणि बिना प्रिस्क्रिप्शन वर्गीकृत औषधांची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यात पुणे विभागात गुरुवारी २२ ठिकाणी तपासणी केली. त्यातील २० विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांना औषध विक्री त्वरित बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी याबाबत माहिती दिली. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधाचे सेवन केल्याने बालके दगावल्याची घटना समोर आल्यानंतर राज्याचा अन्न व औषधे प्रशासन विभाग सतर्क झाला आहे. राज्यातील खोकल्यावरील औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची तपासणी केली जात आहे. यात पुण्यातील कंपन्यांमधील औषधांचा १३ लाखांचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असतानाच औषध विक्रेत्यांचीही तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात गुरुवारी अचानक २२ ठिकाणी तपासणी केली असता बिना प्रिस्क्रिप्शन कफ सिरप विकणाऱ्या आणि बिना प्रिस्क्रिप्शन वर्गीकृत औषधांची विक्री करणाऱ्या २० विक्रेत्यांवर कारवाई केली.
बिना प्रिस्क्रिप्शन कफ सिरप विक्री किंवा बिना प्रिस्क्रिप्शन वर्गीकृत औषधांची विक्री करण्यात येऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही काही विक्रेत्यांकडून असा प्रकार होत असल्याचे कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे औषध विक्रेत्यांना याबाबत सूचित करण्यात येणार असून, नोटीस बजावण्यात येणार आहे, असेही सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी सांगितले.