परीक्षेत कॉपी करताना पकडली गेली ABVP ची राज्यमंत्री; काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:08 IST2025-09-30T19:05:40+5:302025-09-30T19:08:24+5:30
राजस्थानमध्ये एबीव्हीपीच्या विद्यार्थी नेत्याला कॉपी करताना पकडल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

परीक्षेत कॉपी करताना पकडली गेली ABVP ची राज्यमंत्री; काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
ABVP State Minister Caught Cheating:राजस्थानमधील जोधपूरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्यमंत्र्याला परीक्षेत कॉपी करताना पकडण्यात आले. झडतीदरम्यान एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. परीक्षा सुरु असतानाच एबीव्हीपीच्या राज्यमंत्र्याला रंगेहाथ पकडण्यात आले. अभाविपच्या सदस्यालाचा परीक्षेत कॉपी करताना पकडल्यानंतर राजस्थानमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. एनएसयूआयने आता कॉपी करणाऱ्यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे.
राजस्थानमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या प्रादेशिक अधिकारी पूनम भाटी यांना कॉपी करताना पकडण्यात आले. जोधपूरमध्ये झालेल्या परीक्षेदरम्यान पूनम मोबाईल फोनचा वापर करून कॉपी करत असल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर काँग्रेसशी संलग्न विद्यार्थी संघटना, राष्ट्रीय विद्यार्थी संघटना आक्रमक झाली. एनएसयुआने पूनम भाटीला पदावरून त्वरित काढून टाकण्याची आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थी संघटनेने विद्यापीठ प्रशासनावर हे प्रकरण दाबून ठेवल्याचा आरोप केला.
जोधपूरच्या जय नारायण व्यास विद्यापीठात दुसऱ्या सत्राची एमए हिंदी परीक्षा सुरू होती. या परीक्षेदरम्यान, अभाविपच्या राज्य सचिव पूनम भाटी यांना मोबाईल फोन वापरून कॉपी करताना पकडण्यात आले. पर्यवेक्षण करणाऱ्या एका शिक्षिकेने तिच्या या कृती लक्षात घेतल्या आणि त्यांनी तात्काळ पूनम आणि दुसऱ्या विद्यार्थिनीला परीक्षा नियंत्रण कक्षात नेले. विद्यापीठाच्या परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर भाटीची उत्तरपत्रिका जप्त करण्यात आली आणि तिला दुसरी उत्तरपत्रिका देण्यात आली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेदेखील या प्रकरणावर एक निवेदन जारी केले आहे. जय नारायण व्यास विद्यापीठातील एका विद्यार्थी कार्यकर्त्याने कथित परीक्षेत गैरप्रकार केल्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मिळाली आहे. संघटना शिक्षण क्षेत्रातील नैतिकता आणि पारदर्शकतेसाठी वचनबद्ध आहे. संबंधित विद्यार्थी कार्यकर्त्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे आणि प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीने अंतर्गत समितीद्वारे संपूर्ण प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली जाईल. चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शकपणे केली जाईल, असं स्पष्टीकरण एबीव्हीपीकडून देण्यात आलं.