'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी
By सूर्यकांत वाघमारे | Updated: December 4, 2025 14:08 IST2025-12-04T14:07:13+5:302025-12-04T14:08:25+5:30
बॉलिवूडमधल्या ‘स्पेशल २६’ या चित्रपटातल्या कथेप्रमाणे महापे येथे चालणारे बनावट कॉल सेंटर नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने उघडकीस आणले.

'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
ऑनलाइन ट्रेडिंगच्या मोहात पाडून गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या टोळीचे बनावट कॉल सेंटर नवी मुंबईपोलिसांनी उद्ध्वस्त केले. यात जवळपास शंभर तरुण-तरुणी काम करत होते. त्यात अपवादात्मक तरुण वगळता सर्वांना तिथल्या फसव्या कामाची कल्पना होती. यामुळेच त्यांना मागतील तेवढ्या पगारावर नियुक्त केले होते. मात्र, हे काम करताना ना कोणते ऑफर लेटर होते, ना इतर कोणती कागदोपत्री प्रक्रिया. त्यामुळे स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करून गुन्हेगारांना साथ दिल्याने शंभर कामगारही कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.
बॉलिवूडमधल्या ‘स्पेशल २६’ या चित्रपटातल्या कथेप्रमाणे महापे येथे चालणारे बनावट कॉल सेंटर नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने उघडकीस आणले. त्याठिकाणी काहीतरी गौडबंगाल सुरू असल्याची टीप सायबर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सायबर सेलच्या पथकाने रेकी करून मागील आठवड्यात रात्री तिथे छापा टाकला. यावेळी जवळपास शंभर तरुण-तरुणी काम करताना आढळले.
मुलाखतीला येणाऱ्यांची परिस्थिती-मानसिकता हेरून उमेदवारांनी अपेक्षित पगाराचा अंदाजे टाकलेला खडा बिनशर्त मान्य करून त्यांना नोकरीवर घेतले होते. त्या सर्वांना गुन्ह्यात सहआरोपी किंवा साक्षीदार केले जाण्याची शक्यता आहे.
मुख्य सूत्रधार असलेल्या तिघांपैकी अक्षय शिर्के याने यापूर्वी एका कॉल सेंटरमध्ये काम केले होते. यामुळे कामकाजाची पद्धत माहिती असल्याने त्याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने बनावट कॉल सेंटर सुरू करून लोकांना गंडवण्याचा मार्ग निवडला होता.
एकाने वेळीच सोडली साथ
अक्षयने अगोदर एका व्यक्तीसोबत मिळून कॉल सेंटर सुरू केले होते. मात्र, त्या व्यक्तीला संशय आल्याने त्याने भागीदारीतून मुक्त होऊन साथ सोडली होती. यानंतर इतरांना सोबत घेऊन हे कॉल सेंटर सुरू ठेवले.
फसवणुकीचा आकडा कोटीत
कॉल सेंटरमधून अद्यापपर्यंत १२ कोटींची फसवणूक झाल्याचे गुन्ह्यासाठी वापरलेल्या बँक खात्यातून उघडकीस आले आहे. मात्र, हा आकडा आणखी वाढू शकतो.
११ महिन्यांत ३०५ गुन्हे
नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ट्रेडिंगच्या बहाण्याने किंवा इतर आमिषाने ऑनलाइन फसवणुकीचे ३०५ गुन्हे दाखल आहेत. त्यात गळाला लागलेल्या व्यक्तीचे १५० कोटींहून अधिक रुपये हडपले.