नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 05:14 IST2025-10-22T05:13:30+5:302025-10-22T05:14:32+5:30
मुंबईत आगीच्या तीन घटनांमध्ये पाच गाळे आणि गोदाम जळून खाक झाले.

नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई/ पनवेल/ठाणे : ऐन दीपावलीच्या धामधुमीत सोमवारी मध्यरात्री नवी मुंबई आणि पनवेल परिसरात लागलेल्या आगीच्या दोन दुर्घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. पहिल्या घटनेत वाशी सेक्टर १४ मधील इमारतीच्या आगीत चौघांचा तर कामोठेतील घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. वाशीतील आगीत सुंदर बालकृष्णन (४४), पूजा बालकृष्णन (३९) व वेदिका बालकृष्णन (६) हे कुटुंब ठार झाले.
तसेच, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठाणे शहरातील विविध भागात आगीच्या सहा घटना घडल्या. त्यापैकी पाच घटना रात्री ८ ते दीडदरम्यान घडल्या. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. यापैकी बहुतांश आगी फटाक्यांमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मुंबईत पाच गाळे, गोदाम जळून खाक
मुंबईत आगीच्या तीन घटनांमध्ये पाच गाळे आणि गोदाम जळून खाक झाले. १६ ऑक्टोबर रोजी गोरेगावच्या सिद्धार्थनगरमधील अतुल इमारतीतील एका घराला आग लागून धुरामुळे दोघे गुदमरले.