मुंबई येथे मराठी भाषा भवनासाठी २६० कोटींची तरतूद; मंत्री दीपक केसरकरांची माहिती
By नारायण जाधव | Updated: January 30, 2024 12:13 IST2024-01-30T12:13:41+5:302024-01-30T12:13:51+5:30
नवी मुंबई येथे साहित्यिकांच्या राहण्याची व्यवस्था होण्यासाठी महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे.

मुंबई येथे मराठी भाषा भवनासाठी २६० कोटींची तरतूद; मंत्री दीपक केसरकरांची माहिती
नवी मुंबई :- मुंबई येथे मराठी भाषा भवनासाठी 260 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मराठी भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिडको प्रदर्शन केंद्र वाशी येथे आयोजित विश्व मराठी संमेलन 2024 च्या सांगता समारंभात दिली.
यावेळी नुकतेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले डॉ. झहीर काझी, उदय देशपांडे, पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेले राम नाईक, राजदत्त, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर, विजय पाटील, सुप्रिया बडवे, अजय भोसले, डॉ. शामकांत देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केसरकर म्हणाले की, मरीन लाईन्स मुंबई येथे मराठी भाषा भवन करिता 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच नवी मुंबई येथे साहित्यिकांच्या राहण्याची व्यवस्था होण्यासाठी महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे. तर्कतीर्थ पं.लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या कार्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाई येथे एक भवन उभारण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी परदेशातील मराठी माणूस कशा प्रकारे योगदान देऊ शकतो, यासाठी तीन देशांशी करार करण्यात आलेला आहे. मराठी भाषा प्रचार व प्रसारासाठी वर्षाला 50 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे.स्थानिक पातळीवर साहित्य संमेलनाची समिती असावी.
ते पुढे म्हणाले, शिक्षणामध्ये महाराष्ट्र शासनाची मदत म्हणून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांना सांस्कृतिक ओळख देखील करून देण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने झाली. या कार्यक्रमात नुकतेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले डॉ.झहीर काझी, उदय देशपांडे तसेच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेले राम नाईक, राजदत्त यांना मराठी भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांनी आपले मनोगतही व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
या विश्व मराठी संमेलन 2024 चे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे, आमदार गणेश नाईक, आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, माजी आयुक्त विजय नाहाटा आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. या संमेलनात मराठीच्या वैश्विक प्रचारासाठी परिसंवाद, मराठी पुस्तकांचं जग चर्चासत्र, मराठीची सद्य:स्थिती आणि भविष्यकाळ, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राची गरुडझेप, व्यवहारात मराठीचा वापर आणि अर्थाजर्नाची भाषा, मराठमोळ्या खाद्यपदार्थांची पाककला स्पर्धा, मराठी भाषेचा प्रवास आणि नवी क्षितिजे इत्यादी कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यात आले होते