'राजकीय फोन' येत असल्याने तपास थंड? काँग्रेस नगरसेवकाची हत्या करणारे १७ वर्षांनंतरही सापडेना, कोर्टाचा CID ला दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:03 IST2025-11-26T12:02:47+5:302025-11-26T12:03:38+5:30
१७ वर्षांपूर्वी ऐरोलीत घडलेल्या नगरसेवकाच्या हत्या प्रकरणात कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

'राजकीय फोन' येत असल्याने तपास थंड? काँग्रेस नगरसेवकाची हत्या करणारे १७ वर्षांनंतरही सापडेना, कोर्टाचा CID ला दणका
Congress Corporator Anand Kale Murder Case:नवी मुंबईतील ऐरोलीचे काँग्रेस नगरसेवक आनंद काळे यांच्या खून प्रकरणाचा तपास अजूनही न झाल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने पुणे सीआयडीच्या फ्लाइंग स्क्वॉडवर तीव्र नाराजी व्यक्त करत सात दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि न्यायमूर्ती आर.आर. भोंसले यांच्या खंडपीठासमोर आनंद काळे यांचे पुत्र प्रदीप काळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. या याचिकेत प्रदीप काळे यांनी तपास यंत्रणा बदलण्याची मागणी केली आहे, कारण १७ वर्षांनंतरही खुन्यांना अटक झालेली नाही आणि हत्येचे कारणही स्पष्ट झालेले नाही.
राजकीय दबाव आणि ए समरी रिपोर्ट
सरकारी पक्षाचे वकील आशीष आय. सातपुते यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरुवातीला नवी मुंबईपोलिसांनी केला होता. मात्र, कोणताही सुगावा न लागल्याने त्यांनी ए समरी रिपोर्ट दाखल केला. हा अहवाल पोलीस तेव्हा दाखल करतात, जेव्हा तपासानंतर त्यांना खात्री होते की गुन्हा खरा आहे, पण आरोपी कोण आहेत किंवा त्यांच्याविरोधात पुरेसा पुरावा नाही, ज्यामुळे केस उघडकीस येत नाही.
या ए समरी रिपोर्टविरोधात तक्रारदार प्रदीप काळे यांनी विरोध याचिका दाखल केली, जी दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर हे प्रकरण २०१८ मध्ये पुणे सीआयडीच्या फ्लाइंग स्क्वॉडकडे वर्ग करण्यात आले, जे सध्या तपास करत आहेत.
'राजकीय नेत्यांचे फोन येत आहेत'
प्रदीप काळे यांच्या वकिलांनी न्यायालयात मोठी चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, "पुणे पोलीस या प्रकरणात काहीच करत नाहीयेत. माझे पक्षकार अधिकाऱ्यांकडे गेले असता, त्यांना सांगण्यात आले की, या प्रकरणात राजकीय नेत्यांचे फोन येत आहेत. १७ वर्षांपासून हा महत्त्वाचा खटला प्रलंबित आहे."
या प्रकरणाची गंभीर दखल घेत खंडपीठाने पुणे सीआयडीच्या फ्लाइंग स्क्वॉडला स्पष्ट निर्देश दिले आहेत. सात दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करुन २०१८ पासून या प्रकरणाचा तपास करणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचे नाव, पद आणि त्यांचा कार्यकाळ या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यास न्यायालयाने सांगितले. गेल्या सात वर्षांत या अधिकाऱ्यांनी तपासाच्या नावाखाली नेमके काय केले, याचाही पूर्ण तपशील देण्यास सांगण्यात आला आहे.
१७ वर्षांपूर्वीचा थरार
ही हत्या २१ एप्रिल २००८ रोजी नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर-३ मध्ये घडली होती. ऐरोली वॉर्ड ११ चे पहिल्यांदा निवडून आलेले नगरसेवक आनंद महादेव काळे हे नेहमीप्रमाणे मासे बाजाराजवळ आपली गाडी पार्क करून कार्यालयाकडे जात असताना, दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अगदी जवळून गोळ्या झाडल्या. हल्लेखोर मोटरसायकलवरून आले होते. काळे यांच्या डोक्यावर, छातीवर आणि पोटावर गोळ्या लागल्या होत्या. स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, पण त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या घटनेनंतर ऐरोलीतील दुकाने आणि व्यावसायिक कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. त्यावेळी, गुन्हे शाखा उपायुक्त अमर जाधव यांनी ही हत्या करणारे सराईत गुन्हेगार असणार असे म्हटले होते, पण हत्येचा उद्देश मात्र स्पष्ट होऊ शकला नव्हता. या घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबई हादरली होती.