यूएन अधिकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर 'झिरो टॉलरन्स' हवा: अॅड उज्ज्वल निकम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 21:43 IST2025-10-12T21:42:27+5:302025-10-12T21:43:32+5:30
यूएन अधिकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर 'झिरो टॉलरन्स' हवा, अशी मागणी खासदार आणि अॅड. उज्ज्वल निकम यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत केली.

यूएन अधिकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर 'झिरो टॉलरन्स' हवा: अॅड उज्ज्वल निकम
नागपूर: "संयुक्त राष्ट्रांच्या अधिकान्यांकडून होणारे गुन्हे 'संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवू शकतात, असे परखड मत खासदार आणि पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत मांडले. यूएन अधिकारी आणि मिशनवरील तज्ञांची गुन्हेगारी जबाबदारी निश्चित करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी निकम यांनी केली.
महासभेच्या सहाव्या समितीसमोर (कायदे विषयक संबंधाने बोलताना निकम यांनी स्पष्ट केले की, अशा गुन्हयांवर निर्णायक कारवाई करण्याची जबाबदारी सदस्य देश आणि संयुक्त राष्ट्र संघ दोघांचीही आहे. त्यांनी या गुन्हयांबाबत भारताची 'झिरो टॉलरन्स (शून्य-सहिष्णुता) भूमिका मांडली आणि पीडितांसाठी स्थापन केलेल्या निधीमध्ये अधिक आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले.
उज्ज्वल निकम हे सध्या भारताच्या राजनैतिक प्राधान्यक्रमांना पुढे नेण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये एका उच्च-स्तरीय, बहुपक्षीय भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे प्रमुख सदस्य म्हणून दौऱ्यावर आहेत. त्यांनी या संबंधाने थेट न्यू यार्क मधून लोकमतशी बोलताना म्हटले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कणखर भूमिका आपण मांडलेली आहे. आमच्या शिष्टमंडळाने जमैका आणि फ्रान्सच्या स्थायी प्रतिनिधींसोबत महत्वपूर्ण चर्चा केली आहे, तसेच आंतरराष्ट्रीय संकट गटाच्या धोरण तजांशीही संवाद साधला आहे.
या दौऱ्यात भारताचे तंत्रज्ञानातील नेतृत्व आणि परदेशस्थ भारतीयांशी असलेले संबंध यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यावेळी भारतीय खासदारांनी संयुक्त राष्ट्रांचे तंत्रज्ञान दूत अमनदीप सिंग गिल यांची भेट घेऊन Al गव्हर्नन्स आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर चर्चा केल्याची माहिती त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधींना दिली. एका विशेष कार्यक्रमात १० हुन अधिक भारतीय-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांशी संवाद साधला असता त्यांनी अमेरिका-भारत भागीदारीतील त्यांच्या योगदानाचे कौतुक केल्याची माहिती दिली.
८ ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान संयुक्त राष्ट्र मुख्यालयात सुरु असलेल्या या संमेलनात अनेक उच्च-स्तरीय बैठका पार पडल्याचेही निकम यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. १७ ऑक्टोबरला विशिष्ट मंडळ भारतात परत येणार असल्याची माहिती एडवोकेट निकम यांनी लोकमतला दिली.
भारताचे धोरण लेचेपेचे नाही
प्रत्येक देशाच्या सुरक्षे संबंधाने तसेच आंतरराष्ट्रीय गुन्ह्या संबंधाने भारताचे धोरण लेचेपेचे नाही तर अत्यंत कणखर आहे, असा संदेश या परिषदेचे देण्यात भारतीय शिष्टमंडळ यशस्वी ठरल्याचेही एड उज्वल निकम यांनी लोकमत प्रतिनिधीला सांगितले.