तुमची कमी झोप देतेय १७२ आजारांना निमंत्रण; जगातील सर्वात मोठ्या संशोधनातून झाले उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 08:55 IST2025-08-01T08:54:21+5:302025-08-01T08:55:34+5:30
या संशोधनातून लोक अनेकदा किती झोपतात, याचा चुकीचा अंदाज लावत असल्याचेही समोर आले.

तुमची कमी झोप देतेय १७२ आजारांना निमंत्रण; जगातील सर्वात मोठ्या संशोधनातून झाले उघड
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सध्या धकाधकीच्या आयुष्यात लोकांना पुरेशी झोप मिळणेही अवघड झाले आहे. मात्र कमी झोप घेतल्यास तुम्हाला तब्बल १७२ पेक्षा अधिक आजार होऊ शकतात, असे एका संशोधनात समोर आले आहे.
कमी झोपेमुळे हृदयरोग, नैराश्य आणि अगदी अकाली मृत्यू होत असल्याचे आतापर्यंत संशोधक म्हणत होते, मात्र कमी झोपेमुळे मधुमेह, मूत्रपिंड निकामी होणे आणि पार्किन्सनसह ‘१७२ आजार’ होत आहेत, असे ‘हेल्थ डेटा सायन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या जगातील सर्वात मोठ्या संशोधनातून समोर आले आहे.
अभ्यासात काय आढळले?
झोपेची लय तुटणे, दररोज झोपेचा वेळ बदलत राहणे, मध्येच झोप तुटणे अशा सवयी तब्बल १७२ आजारांशी जोडलेल्या असल्याचे आढळले. ज्यांची झोप सतत बिघडलेली होती, त्यांना अशक्तपणा येण्याचा, गँगरीन होण्याचा धोका दुप्पट होता, असेही आढळले.
झोप पूर्ण न झाल्याचे धोके?
जे लोक दररोज आठ तास झोप घेण्याचा दावा करत होते ते प्रत्यक्षात सहा तासांपेक्षा कमी झोपत असल्याचे आढळून आले. या संशोधनातून लोक अनेकदा किती झोपतात, याचा चुकीचा अंदाज लावत असल्याचेही समोर आले. ३७ % पार्किन्सनचा धोका, ३६ % टाइप २ डायबेटीस, २२ % किडनी फेल होणे.
नेमकी किती झोप घ्यावी?
यापूर्वी झोपेसंदर्भात ‘सात ते नऊ तास झोप आवश्यक’ असे सांगितले जायचे; पण या अभ्यासातून दिसून आले की तुम्ही केव्हा झोपता आणि किती नियमितपणे झोपता हे जास्त महत्त्वाचे आहे.
कमी झोपेमुळे कोणते आजार?
सीओपीडी (फुप्फुसांचा आजार), मूत्रपिंड निकामी होणे, टाइप २ मधुमेह, पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण वाढणे, सी-रिॲक्टिव्ह प्रोटीन वाढणे/जळजळ.