"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:19 IST2025-07-29T18:15:26+5:302025-07-29T18:19:29+5:30

Rahul Gandhi Criticize Modi Government: ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अचानक झालेल्या युद्धविरामावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे.

"You declared a ceasefire on the night of Operation Sindoor, to fight...", Rahul Gandhi's criticism | "तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   

"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताच्या संरक्षण दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या मोहिमेंतर्गत भारताच्या संरक्षण दलांनी ७ मे रोजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांना लक्ष्य केलं होतं. मात्र चार दिवस चाललेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांनी १० मे रोजी युद्धविराम घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. आता याच युद्धविरामावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान, केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. तुम्हीतर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला. लढण्याची इच्छाशक्तीच दाखवली नाही, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अचानक झालेल्या युद्धविरामावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली. ते म्हणाले की,  काल येथे सॅम माणेकशॉ यांच्या एका विधानाचं उदाहरण दिलं गेलं. तेव्हा सॅम माणेकशॉ इंदिरा गांधी यांना म्हणाले होते की, आम्ही आता कारवाई करू शकत नाही. आम्हाला सहा महिन्यांचा  अवधी द्या. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी त्यांना पूर्ण वेळ दिला. राहुल गांधी पुढे म्हणाले की, आमच्या संरक्षणमंत्र्यांनी काल सभागृहात सांगितले की, आम्ही १.३५ वाजता पाकिस्तानला सांगितले की, आम्ही दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. हे आक्रमण नव्हतं. तसेच पुढेही कुठलं आक्रमण होणार नाही. तुम्ही ३० मिनिटांमध्येच पाकिस्तानसमोर शरणागती पत्करली. हे सांगितलं की, आमची लढण्याची इच्छाशक्ती नाही आहे. सरकारने वैमानिकांचे हातपाय बांधले.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, सरकारने चूक केली आहे. आपलं कुणाशी भांडण झालं आणि आपण त्याला सांगितलं की, भावा आता ठीक आहे . आम्हाला भांडण नको आहे. आम्ही एक फटका मारला आहे. आता दुसरा मारणार नाही. येथे चूक लष्कराकडून नाही तर सरकारकडून झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण युद्ध थांबवलं, असं २९ वेळा सांगितलं आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये इंदिरा गांधी यांच्या तुलनेत ५० टक्के दम असेल तरी त्यांनी येथे डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत, असं सांगावं, असं आव्हानही राहुल गांधी यांनी दिलं. 

Web Title: "You declared a ceasefire on the night of Operation Sindoor, to fight...", Rahul Gandhi's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.