लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 05:33 IST2025-09-30T05:32:49+5:302025-09-30T05:33:06+5:30
पर्यावरण कार्यकर्ता सोनम वांगचुक यांना रासुकाखाली केलेली अटक चुकीची असून, त्यांच्यासह इतरांची तात्काळ व बिनशर्त सुटका करण्याची मागणी कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सने केली आहे.

लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
लेह : पर्यावरण कार्यकर्ता सोनम वांगचुक यांना रासुकाखाली केलेली अटक चुकीची असून, त्यांच्यासह इतरांची तात्काळ व बिनशर्त सुटका करण्याची मागणी कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सने केली आहे. लडाखला राज्याचा दर्जा आणि इतर महत्त्वाच्या मागण्या न पूर्ण करून केंद्र सरकार लडाखच्या लोकांना ‘परके’ बनवत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स ही लेह अपेक्स बॉडीसोबत राज्याच्या दर्जासाठी आणि इतर घटनात्मक संरक्षणासाठी आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. त्यांनी लेहमधील हिंसाचारासाठी थेट केंद्रशासित प्रदेश प्रशासनाला जबाबदार धरले असून, हे आंदोलन देशभर पसून शकते असा इशारा दिला आहे. चर्चेसाठी लेह अपेक्स बॉडीने अटी ठेवल्या असून, सतत संवाद साधून तोडगा काढू असे सरकारने म्हटले आहे.
हिंसाचारामुळे असंख्य पर्यटकांकडून बुकिंग रद्द
लडाखमधील हिंसाचारामुळे चालू हंगामात तेथील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. मोबाईल इंटरनेट सेवाही बंद असून त्यामुळे पर्यटकांचे बुकिंग रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक पर्यटक हॉटेलमध्येच अडकून पडले आहेत. व्यावसायिकांनी सांगितले की, २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे लडाखमधील पर्यटन व्यवसायालाही फटका बसला.
लेहमधील एका हॉटेलचे व्यवस्थापक नसीब सिंग यांनी सांगितले की, पर्यटकांकडून हॉटेलच्या खोल्यांकरिता केलेली आगाऊ बुकिंग रद्द करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.
केंद्र सरकारने लडाख आणि जम्मू-काश्मीर या दोघांचाही विश्वासघात केला आहे. केंद्राने आधी जम्मू-काश्मीरसाठी व आता लडाखसाठी स्वतःच आखलेल्या योजनांचे पालन केले नाही. खोटी आश्वासने देऊन दिशाभूल केली.
ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री, जम्मू
कारगिल युद्धातील माजी सैनिक गोळीबारात ठार
लडाखमध्ये सुरक्षा दलांच्या गोळीबारात मरण पावलेल्यांमध्ये कारगिल युद्धातील माजी सैनिक त्सेवांग थारचिन यांचा समावेश असल्याचे समोर आल्यानंतर, काँग्रेसने सोमवारी ही घटना संतापजनक आणि अत्यंत दुःखद असल्याचे म्हटले आहे. त्या पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, त्सेवांग थारचिन हे सियाचीन ग्लेशियरवरही तैनात होते तसेच १९९९च्या कारगिल युद्धात शौर्याने लढले. त्यांचे वडीलही भारतीय लष्करात होते. लडाखसाठी सहावा अनुसूची लागू करण्याच्या मागणीसाठी त्सेवांग शांततामय पद्धतीने आंदोलन करत होते.