इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 17:51 IST2025-04-23T17:50:16+5:302025-04-23T17:51:07+5:30
इंदूरमधील दोन हुशार विद्यार्थी योगेश राजपूत आणि गार्गी लोंढे हे मेरिट लिस्टमध्ये आले आहेत.

इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मंगळवारी निकाल जाहीर केला. मध्य प्रदेशातील दोघांनी नेत्रदिपक कामगिरी केली आहे. इंदूरमधील दोन हुशार विद्यार्थी योगेश राजपूत आणि गार्गी लोंढे हे मेरिट लिस्टमध्ये आले आहेत. यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या या दोघांची यशोगाथा जाणून घेऊया...
इंदूर येथील रहिवासी योगेश राजपूतने पाचव्या प्रयत्नात ५४० वा रँक मिळवला आहे. यापूर्वी त्याची इंडियन पोस्टल सर्व्हिसमध्ये निवड झाली होती, परंतु तो त्यावर समाधानी नव्हता. योगेशने सांगितलं की, "बारावीनंतर २०१९ मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली. मी खूप जास्त सेल्फ स्टडी केला आणि सोशल मीडियाचा वापर कमी केला. माझं लक्ष अभ्यासावरुन विचलित होत असल्याचं पाहून मी अनेक वेळा इन्स्टाग्राम डिलीटही केलं."
"मी दररोज सुमारे ७ ते ८ तास अभ्यास करायचो. स्ट्रेस टाळण्यासाठी बॅडमिंटन खेळायचो. माझे वडील राजगड जिल्ह्यातील उद्दमखेडी येथे एक दुकान चालवतात. ते माझं सर्वात मोठं प्रेरणास्थान आहेत. आजच्या युगात टेक्नॉलॉजीमुळे अभ्यास इतका सुलभ झाला आहे की महागड्या कोचिंग इन्स्टिट्यूटची गरज नाही. आता ध्येय सरकार आणि जनता यांच्यातील एक मजबूत दुवा बनण्याचं आहे."
गार्गी लोंढे हिने यूपीएससीमध्ये ९३९ वा रँक मिळवला आहे. ही तिची दुसरी मुलाखत होती. २०२३ मध्ये ती फायनलपर्यंत पोहोचली पण निवड झाली नाही. हार न मानता, तिने आत्मविश्वासाने पुन्हा तयारी सुरू केली. गार्गीने २०२२ मध्ये पदवी पूर्ण केली आणि नंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. माझं लक्ष फक्त ध्येयावर राहावं म्हणून मी सोशल मीडियापासून स्वतःला दूर केलं होतं. हे अडीच वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे असं गार्गीने म्हटलं आहे.