लोकशाहीला कमजोर करणारे सत्याग्रह नाही करु शकत; सीएम योगींचा काँग्रेसवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 15:27 IST2023-03-26T15:27:16+5:302023-03-26T15:27:46+5:30
'परदेशात जाऊन आपल्याच देशावर टीका करणारा, प्रश्न उपस्थित करणारा सत्याग्रहाबद्दल बोलत आहे.'

लोकशाहीला कमजोर करणारे सत्याग्रह नाही करु शकत; सीएम योगींचा काँग्रेसवर घणाघात
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. काँग्रेसच्या राजघाटावरील सत्याग्रह आंदोलनावर टीका करताना ते म्हणाले की, "जे लोक लोकशाही कमकुवत करतात ते सत्याग्रह करू शकत नाहीत. भाषावाद आणि प्रादेशिकवादाच्या आधारे देशाचे विभाजन करणारेही सत्याग्रह करू शकत नाहीत. ज्यांना माणसांबद्दल सहानुभूती नाही, त्यांना सत्याग्रहाचा अधिकार नाही.' रविवारी एका कार्यक्रमाला संबोधित करताना योगींनी ही टीका केली.
संबंधित बातमी- 'राहुल गांधी हार्वर्ड आणि केंब्रिजमध्ये शिकले, तुम्ही त्यांना पप्पू म्हणता', प्रियंका गांधी संतापल्या
मुख्यमंत्री योगी पुढे म्हणाले, 'गांधीजींनी आपल्या जीवनात सत्य, अहिंसेला सर्वाधिक स्थान दिले. या गोष्टीसाठी त्यांनी फक्त विनंती केली. त्यांच्या विनंतीला सत्याग्रह म्हणतात. अनेकांना देशावर राज्य करण्याची संधी मिळाली, पण ज्यांना माणसांबद्दल भावना नाही, ते सत्याग्रह कसा करतील? असत्याच्या मार्गावर चालणारा सत्याग्रहाबद्दल बोलू शकत नाही. प्रचंड भ्रष्टाचारात बुडलेले लोक सत्याग्रह करू शकत नाहीत,' अशी टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाची माहिती देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, 'सत्याग्रह म्हणजे मन, शब्द आणि कृती. ज्यांचे आचार-विचार, शब्द आणि कृती भिन्न आहेत, ते सत्याग्रह करू शकत नाही. परदेशात जाऊन आपल्याच देशावर टीका करणारा, आपल्याच देशावर प्रश्न उपस्थित करणारा आणि आणि ज्याच्या मनात देशाच्या शूर सैनिकांबद्दल आदर नाही, तो सत्याग्रहाबद्दल बोलत असेल, तर ही मोठी विडंबना आहे,' असंही ते यावेळी म्हणाले.